गोंदिया : भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेवून धान उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा सांगितली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार असून त्यांनी निराश होऊ नये, असे सांगितले.शासनाकडून धान उत्पादक शेतकरी हिताचे निर्णय घेतले जात आहे व ते लवकरच जाहीर करून त्यांची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. शिष्टमंडळात प्रामुख्याने आ.विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, माजी आ. भेरसिंग नागपुरे, जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर आदींचा समावेश होता.भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी अनेक समस्यांनी ग्रस्त असून आर्थिक दृष्ट्या हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बोनसऐवजी प्रतिहेक्टर ७ हजार ५०० रुपये सरसकट अनुदान देवून धानाचे आधारभूत भाव वाढविण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे उन्हाळी पिकासाठी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणीही निवेदन देवून शिष्टमंडळाद्वारे करण्यात आली.
धान उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच दिलासा
By admin | Updated: May 2, 2015 01:45 IST