गोंदिया : शहरात मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, परिणामी मोकाट जनावरांचे बस्तान रस्त्यांवरच जास्त दिसून येते. शहरातील मुख्य बाजारपेठ असो की, मुख्य व महामार्ग तसेच गल्लीबोळातही मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. रस्त्याच्या मधात बसून असणाऱ्या मोकाट जनावरांमुळे एकतर वाहतूक करताना वाहनचालकांना त्रास होते. शिवाय मोकाट जनावरांमुळे अपघात घडून कित्येकांचा जीव गेल्याच्या घटनाही जिल्ह्यात घडल्या आहेत. मध्यंतरी नगर परिषदेने मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम हाती घेतली होती. मात्र आता वर्षभरापासून मोहीम बंद असल्याने मोकाट जनावरांचा वावर रस्त्यांवरच दिसत आहे.
-------------------------------------
या मार्गावर वाहने जपून चालवा
मुख्य बाजार परिसर
फुलचूररोड
रिंगरोड
विवेकानंद कॉलनीरोड
बालाघाटरोड
-------------------------
३) मोकाट जनावरांचा वाली कोण?
पाळलेल्या जनावरांवर चारापाण्याचा खर्च करण्यापेक्षा त्यांना मोकाट सोडून दिले तर स्वत: आपली व्यवस्था करून घेतात व यामुळेच गौपालक त्यांना सोडून देतात. मात्र त्यांना पकडले तर तेच धावून येतात अशी स्थिती आहे. यामुळे या मोकाट जनावरांचा वाली कोण? असा सवाल नागरिकांना पडला आहे.
-------------------------------------
दोन वर्षांपासून कारवाई नाहीच
मागील दोन-तीन वर्षांपूर्वी नगर परिषदेने मोकाट जनावरांना पकडण्यासाठी एका संस्थेला कंत्राट दिले होते. त्यानुसार, संस्थेकडून मोकाट जनावरांना पकडण्यात आले होते. मात्र यानंतर गोपालक चांगलेच चवताळले होते व त्यांनी थेट नगर परिषदेत धाव घेतली होती. यानंतर मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम बंद पडली. परिणामी आता मोकाट जनावरांची समस्या वाढूनही त्यांना पकडण्यासाठी काहीच केले जात नसल्याचे दिसत आहे.
---------------------------------
पकडलेली जनावरे परत करणार नाही
मोकाट जनावरांची समस्या लक्षात घेता गोपालकांना त्यांची जनावरे पकडून ८ दिवसांत ताब्यात घेण्याची सूचना दिली आहे. त्यानंतर नगर परिषद मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम सुरू करणार. तसेच पकडलेल्या जनावरांना मात्र आता गोपालकांना परत केले जाणार नाही.
- करण चव्हाण
मुख्याधिकारी, नगर परिषद, गोंदिया