सालेकसा : ओलिताच्या क्षेत्रात असलेल्या जमिनीत धानपिकावर पावसाळ्याच्या सुरुवातीला विलंबाने आलेल्या पावसाचा फटका आणि नंतर पिकावर मावा तुडतुडासारख्या रोगाचे आक्रमण यामुळे शेतकऱ्यांचे दिवाळे निघत आहे. शेतकरी वर्ग औषधीची फवारणी करुन करुन थकला तरी रोग दूर होण्याचे नाव घेत नाही. धानाच्या उत्पादनापेक्षा लागणारा खर्च चार पट लागल्याचे अनेक शेतकरी सांगत आहेत.यंदा सुरूवातीपासूनच असमाधानकारक पाऊस पडल्यामुळे सर्वत्र भरघोस धान पिक मिळण्याचे संकेत दिसत नव्हते. यात हलक्या प्रजातीचे धान पीक जे वरथेंबी पावसावर अवलंबून आहे, ते योग्य प्रमाणात होत असल्याचे दिसून येत नव्हते. परंतु ओलिताच्या क्षेत्रात असलेले व खाल भागात असलेल्या जमिनीतील पिकांना सुरुवातीपासून थोड्या प्रमाणात लाभ मिळत असल्याने त्या शेतकऱ्यांचे फारसे नुकसान होताना दिसत नाही.यंदा अनेक ठिकाणी उन्हाळ्यात उन्हाळी धानपिक घेण्यात आले व ते उशिरा झाले. जमिनीचा ओलावा तुटण्यापूर्वीच पावसाचे आगमन झाले नाही. विलंबाने पाऊस पडूनही शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची शेती केली. परंतु खरीप हंगामात धानाची शेती सुरुवातीपासून रोगग्रस्त राहिल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जाते. शेतकऱ्यांनी फवारणी केली व इतर वेगवेगळ्या किटकनाशकांचा पावडर व द्रव्याचा वापर केला. परंतु जडामुळात असलेले रोग दूर झालेले नाही. फवारणी केलेल्या औषधांचा प्रभाव जास्तीत जास्त एक आठवडा राहून पुन्हा रोग डोके वर काढू लागले. औषधी वापरानंतर आठ दिवसात तीच गत असा क्रम राहिला. अगदी धान कापणीपर्यंत शेतकऱ्यांना औषधीचा उपयोग करावा लागत आहे. कापणीच्या काळात औषधीचा उपयोग हा मनुष्याला व जनावरांना नुकसानकारक ठरतो. धानापासून तयार केलेले तांदूळ औषधीयुक्त तसेच जनावरांसाठी तयार केलेले कुकुस व तणीससुद्धा औषधीयुक्त राहते. त्यामुळे त्याचे सेवन शरीराला नुकसान करणारे ठरते. परंतु शेतकरी याची परवा न करता धानावरचा रोग दूर करण्यासाठी अगदी शेवटपर्यंत औषधीचा उपयोग करतो. याचा विपरीत परिणाम जास्त होतो. कृषी वैज्ञानिकांनी यावर संशोधन करुन शेतकऱ्यांच्या हितासाठी पाऊल उचलावे, ही अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)
मावा-तुडतुड्याने लावली धान पिकाची वाट
By admin | Updated: October 19, 2014 23:39 IST