गोंदिया : जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे वैद्यकीय अधिकारी, कंत्राटी वाहन चालक व इतर कर्मचाऱ्यांचे आठ-आठ महिने वेतन होत नाही. वेतनासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिष कळमकर प्रयत्न करीत नसल्याचा आरोप करीत जिल्ह्यातील डॉक्टरांनी आरोग्य विभागाच्या मासिक बैठकीवर गुरुवारी बहिष्कार टाकला. गोंदिया जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची मासिक बैठक गुरुवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. परंतु डॉक्टरांच्या समस्या न सोडविता त्यांच्यावर कामे लादली जातात. या प्रकराला कंटाळून डॉक्टरांनी मासिक बैठकीवर बहिष्कार घातला. प्रत्येक महिन्याचे वेतन १ ते ७ तारखेपर्यंत न झाल्यास मासिक सभेवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. दिवाळीपूर्वी २२ आॅक्टोबर रोजी झालेल्या मासिक सभेत डॉक्टरांनी बहिष्कार टाकला होता. परंतु डॉक्टरांच्या समस्येकडे जिल्हा आरोग्य अधिकारी हेतूपूरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप डॉक्टरांकडून होत आहे. १० महिन्यांपासून प्राथमिक आरोग्य केंद्रांना कसल्याच प्रकारचे अनुदान देण्यात आले नाही. रुग्ण कल्याण समितीचा निधी व संदर्भ सेवेसाठी अनुदान प्राप्त झाले नाही. रुग्णांना संदर्भ सेवा देण्यासाठी आपल्या खिशातून हजारो रुपये भरावे लागते. मानव विकास कार्यक्रमांतर्गत शिबिराचे आयोजन करा, असे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी देत असून आपल्या खिशातील पैसे खर्च करा. आल्यावर तुम्हाला अनुदान देण्यात येईल असे सांगतात. परंतु १० महिन्यांपासून आरोग्य शिबिरांसाठी मानव विकासचा पैसा न आल्यामुळे एका-एका डॉक्टरांच्या खिशातून लाखो रुपये शिबिरासाठी खर्च झाले आहेत. हा मोठा खर्च पाहून अनेक तालुक्यात शिबिरे घेण्यातच आली नाही. त्यामुळे अनेक जि.प.सदस्यांनी सदर मुद्दा सभागृहात गाजविला होता. शिबिरात स्तनदा माता, गरोदर माता व ० ते २ वर्षाआतील बालकांची तपासणी करायची असते. परंतु पैसा न आल्यामुळे आरोग्य शिबिरे घेण्यात आली नाही. परिणामी गरोदर माता, स्तनदा माता व बालके गंभीर होवून दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या डॉक्टरांनी शिबिरे घेतली त्यांच्यावर लाखो रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसला. त्यामुळे डॉक्टर दहशतीत आले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी वेतनासाठी सक्षम निर्णय न घेतल्यामुळे त्यांचे वेतन अडकले आहे. परिणामी सर्व डॉक्टरांनी मॅग्मोचे अध्यक्ष चंदू वंजारे यांच्या नेतृत्वात बहिष्कार टाकला. (तालुका प्रतिनिधी)
मासिक बैठकीवर डॉक्टरांचा बहिष्कार
By admin | Updated: November 12, 2014 22:45 IST