मिळाला न्याय : पाच महिन्यांच्या लढाईची यशस्वी सांगतागोंदिया : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत राज्यात ५४१ डॉक्टर काम करीत होते. परंतु १ ते ७ जुलै २०१४ दरम्यान मॅग्मो संघटनेने पुकारलेल्या संपाला या डॉक्टरांनी आपला पाठिंबा दर्शविल्यामुळे त्यांना शासनाने कार्यमुक्त केले होते. परंतु या डॉक्टरांना उच्च न्यायालयाने पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे बाल स्वास्थ कार्यक्रमात काम करणाऱ्या डॉक्टरांचा पुन्हा सेवेत रुजू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.आपल्या विविध मागण्यांसाठी मॅग्मो संघटनेने जिल्हा परिषदेसमोर राज्यभर संप पुकारला. या संपाला राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमात काम करणाऱ्या डॉक्टरांनी पाठिंबा दर्शविल्यामुळे त्या डॉक्टरांना ४ जुलै रोजी शासनाने कार्यमुक्त केले होते. या संदर्भात बालस्वास्थ कार्यक्रमात काम करणाऱ्या डॉक्टरांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या डॉक्टरांना रुजू करण्यात येत आहे. मात्र रुजू होताना अटी व शर्ती मान्य असल्याचा करारनामा त्या डॉक्टरांना लिहून द्यावे लागणार आहे. यानंतर हे डॉक्टर कोणत्याही संपात सहभागी होणार नाही. असे करारनामामध्ये लिहून द्यावे लागणार आहे. गोंदिया जिल्ह्यात ३६ डॉक्टर कार्यरत असून त्यांना लवकरच नियुक्ती आदेश दिला जाणार आहे. डॉ. योगेश पटले, सचिन दहिवले, विशाल गोळी, हरीश शेंडे, मुकेश मेश्राम, अमर आहूजा, योगेश हिरापुरे, राणा खान, दीशा पटले, सरिता ठाकूर, खेमलता पटले, श्वेता कांबळे, राहूल बिसेन, सुषमा पटले, मयुरी कोतवाल, प्रिया ताजने, श्रद्धांजली चौधरी, लक्ष्मीकांत वाघमारे, प्रिया चंद्रिकापुरे, पद्मा देवांगण, संकेत परशुरामकर, डॉ. नितीन पाटील, डॉ. वनिता कापगते, प्रगती खंडाते, नेतालसिंग बघेले, प्रशांत परशुरामकर, सुषमा डोये, तृप्ती घासले, मनीष दमाहे, सुरेखा मानकर, रोशन थोटे, अमित येडे, सरिता बघेले, दीक्षा पारधी, हेमंत ठाकरे, प्रिती बावनकर या डॉक्टरांचा समावेश आहे. या डॉक्टरांना कार्यमुक्त केल्यामुळे मागील पाच महिन्यापासून शाळेतील बालविद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी झाली नव्हती. आरोग्य सेवा विस्कळीत झाल्यामुळे व उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमात काम करणाऱ्या सर्व डॉक्टरांना रुजू करण्यात येत आहे. कार्यमुक्त केल्यापासून आजतागायतचा महिन्याचा वेतन डॉक्टरांना मिळणार नाही, असे नमुद करण्यात आले आहे. मॅग्मोने आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. डॉक्टरांच्या संपाला आपणही पाठिंबा द्यावा जेणेकरुन ही संघटना आपल्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेईल, असे या डॉक्टरांना वाटत होते. मात्र मागील सरकारने संपात सहभागी झालेल्या डॉक्टरांना आश्वासन दिल्यामुळे त्यांनी संप मागे घेतला. व या संपाचा फटका राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमात काम करणाऱ्या डॉक्टरांना बसला. (तालुका प्रतिनिधी)
‘त्या’ डॉक्टरांचा मार्ग मोकळा
By admin | Updated: November 24, 2014 23:00 IST