गोंदिया : पोलीस मुख्यालय कारंजा येथे जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व उपविभागामधील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी या क्रीडा स्पर्धेत भाग घेतला. क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनानंतर या स्पर्धकांनी राखीव पोलीस उपनिरीक्षक चंद्रबहादूर ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उद्घाटन संचलन केले. संचलनानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. यावेळी खेळाडूंना खेळ भावनेबद्दल शपथ ग्रहण केली. सदर क्रीडा स्पर्धा चार दिवस चालणार असून या स्पर्धेत खो-खो, कबड्डी, हॉलीबॉल, बास्केटबॉल, हेंडबॉल, कुस्ती, अॅथलेटिक्स, व्हॅटलिफ्टींग ज्युडो, हॉकी व फुटबॉल असे खेळ खेळले जाणार आहे.उद्घाटन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, स्पर्धकांमधील खेळाडू वृत्ती वृिद्धंगत व्हावी यासाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणे आवश्यक असते. खेळतांना पराभव किंवा जिंकणे या दोन्ही गोष्टी समान आहेत. योग्य भावना मनात ठेवून खेळ खेळला जावा असे ते म्हणाले. पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना, मार्गदर्शन करताना म्हणाले, पोलीस रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावीत असतात. पोलीसांच्या जीवनात कामाबरोबर खेळाडू वृत्ती व्हावी, त्यांच्या गुणांना प्रोत्साहन व वाव मिळावा त्यांच्यात एकोप्याची भावना निर्माण व्हावी यासाठी पोलीस विभागाकडून अशा स्पर्धाचे आयोजन केले जाते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, पोलीस उपअधीक्षक मुख्यालय सुरेश भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास राठोड, आमगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी दिपाली खन्ना, परीवेक्षाधिन उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, जिल्हा क्रिडा अधिकारी अशोक गिरी, राखीव पोलीस निरीक्षक सुनील बांबडेकर, राखीव पोलीस उपनिरीक्षक चंद्रबहादूर ठाकूर व जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
By admin | Updated: August 31, 2015 01:36 IST