सर्वच विभागाचा आढावा : पदाधिकारी व सदस्यांसोबत साधला संवादगोंदिया : कलवसुलीतील दिरंगाईमुळे डबघाईस आलेल्या नगर परिषदेतील ढिसाळ कारभार आणि शहरातील अस्वच्छतेच्या गंभीर मुद्द्यावरून जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांनी शुक्रवारी (दि.२१) नगर परिषद कार्यालयात ठाण मांडून सर्वच विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. या भेटीत त्यांनी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांसोबतच पदाधिकारी व सदस्यांसोबतही संवाद साधून कामात सुधारणा करण्याचे निर्देश दिले.गोंदिया नगर परिषदेचा कारभार तसा येथील नागरिकांसोबतच वरिष्ठ अधिकाऱ्यांपासूनही लपलेला नाही. अलिकडे अस्वच्छतेचा विषय ‘लोकमत’ने मांडल्यानंतरही शहरातील स्वच्छतेचा विषय न.प.ने गांभिर्याने घेतला नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊनच न.प.च्या कारभाराचा आढावा घेण्याचे ठरविले. पालिकेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी २१ नोव्हेंबर रोजी नगर परिषद कार्यालयात धडक दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्या कक्षात सुमारे चार तासांपेक्षा अधिक वेळ ठाण मांडले. या बैठकीत त्यांनी कर वसुली विभागाच्या अधिकाऱ्यांसह मुख्याधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर घेतले.विशेष म्हणजे यावेळी त्यांनी पालिकेचा बाजार, प्रशासन, नगर रचना, विद्युत, लेखा, आरोग्य व शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी सैनी यांनी पालिकेचे पदाधिकारी व सदस्यांसोबतही चर्चा केली. या बैठकीला नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, उपाध्यक्ष हर्षपाल रंगारी, माजी उपाध्यक्ष पंकज यादव, विजय रगडे, नगरसेवक बंटी पंचबुद्धे, दीपक नशिने, मनोहर वालदे, श्रद्धा नाखले, प्रमिला सिंद्रामे, सुनिता हेमणे, अनिता बैरिसाल, सुशिला भालेराव, राजेश बघेल, विष्णू नागरीकर व अन्य सदस्य उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला न.प. अधिकाऱ्यांचा वर्ग
By admin | Updated: November 22, 2014 23:03 IST