कंत्राटदारांना निर्देश : कामाचा दर्जा चांगलाच ठेवागोंदिया : सिमेंट नाला बंधाऱ्याच्या कामात वापरण्यात येणाऱ्या सिमेंटचे नमुने तपासणी करुन योग्य असल्याची खात्री करुनच त्याचा वापर करावा, तसेच काळी कठिण गिट्टी व चांगल्या प्रतिच्या वाळूचाच बंधाऱ्याच्या कामात वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदारांना दिले.राज्य शासनाचा महत्वकांक्षी कार्यक्रम असलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तिरोडा तालुक्यातील चांदोरी आणि गोरेगाव तालुक्यातील चिलाटी या गावाजवळील नाल्यावर बांधण्यात येत असलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्याच्या कामाला जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी ३ व ४ जून रोजी भेट देऊन पाहणी केली.सिमेंट नाला बंधाऱ्याच्या बांधकामामुळे नाल्यात दूरपर्यंत पाणी अडवून भूगर्भात पाण्याची साठवणूक होण्यास बंधारे उपयुक्त ठरणार आहे. सिंचनासाठी देखील या बंधाऱ्यातील पाण्याचा वापर बंधाऱ्याच्या शेजारच्या शेतीला होणार आहे, असे डॉ.सूर्यवंशी म्हणाले. त्यांच्यासमवेत तिरोडाचे उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे, तिरोडा तालुका कृषी अधिकारी पोटदुखे व गोरेगाव तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने उपस्थित होते. शासन तलावांच्या या जिल्ह्यात पाण्याचा सदुपयोग होण्यासाठी आणि त्यातून जिल्हा अधिक समृद्ध होण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. त्या पैशाचा योग्य विनियोग लावण्यासाठी जिल्हाधिकारी प्रयत्नशील आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांनी केली बंधाऱ्याच्या कामांची पाहणी
By admin | Updated: June 5, 2015 01:53 IST