गोंदिया : आपल्या गृहजिल्ह्यात बदली होण्याची प्रतीक्षा करीत मागील १० ते १२ वर्षापासून परजिल्ह्यात सेवा देत असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. सोमवारी या शिक्षकांनी आपली व्यथा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेसमोर मांडली. त्यांची परिस्थिती ऐकून आणि केवळ काही अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे व गैरसमजामुळे त्यांना आतापर्यंत हा त्रास सहन करावा लागल्याचे लक्षात आल्यानंतर वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारीही सुन्न झाले. या शिक्षकांचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याची ग्वाही त्यांनी दिली.आंतरजिल्हा बदली प्रक्रिया काही वर्षापासून बंद असल्यामुळे शंभरावर शिक्षक गोंदिया जिल्हा परिषदेत पदस्थापना मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या शिक्षकांनी आंतरजिल्हा बदली कृती समितीमार्फत दि. १६ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षण सभापती, शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. जिल्हा परिषद प्रशासनातील पदाधिकारी व अधिकारी यांनी आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांच्या व्यथा ऐकून त्यावर सहानुभूतीपूर्वक विचार करू, असे सकारात्मक आश्वासन दिले. जिल्हा परिषदेतील काही वर्षापासून रखडलेले केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक ही पदे पदवीधर, पदोन्नतीने येत्या २ महिन्यात भरून रिक्त होणाऱ्या जागेवर आंतरजिल्हा बदलीतून शिक्षकांना पदस्थापना देण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी सर्व प्रकारच्या जिल्हा बदलीवरील स्थगिती उठली असून पदोन्नती व संच मान्यता झाल्यावर तसेच सेवानिवृत्ती व निधनाने रिक्त जागेवर पदस्थापना देण्याचे आश्वासन दिले. दोन दिवसात आढावा घेणार असल्याचे पी.जी.कटरे म्हणाले. जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनीही अनुकूलता दर्शविली.(जिल्हा प्रतिनिधी) अन् अधिकारी-पदाधिकारी गहिवरलेअनेक वर्षापासून परजिल्ह्यात ४०० ते १६०० किमी अंतरावर कुटूंबापासून व घरापासून लांब कार्यरत असल्यामुळे त्यांना कौटुंबिक सुखापासून वंचित रहावे लागत आहे. कुणाचे आई-वडील आजारी आहेत तर कुणाचे मुलबाळ गावाकडे आहेत. हजारो किलोमीटर अंतरावर कार्यरत असल्यामुळे या शिक्षकांची सहा-सहा महिने भेट होत नाही. त्यामुळे आई-वडीलांचा वृध्दापकाळातील आजारपणाचा आधारच हरवला आहे. अनेक पती-पत्नी हजारे किमी अंतरावर कार्यरत असल्यामुळे त्यांच्यात घटस्फोटापर्यंत नाते ताणले गेले आहेत. काही शिक्षकांनी आई-वडील, नातेवाईक यांचा मृत्यू झाल्यावर त्यांचे अंत्यसंस्कार सुध्दा करता आले नाही. शिक्षकांच्या अशा अनेक समस्या ऐकून अधिकारी व पदाधिकारी गहिवरले.
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांनी मांडल्या व्यथा
By admin | Updated: November 18, 2015 01:54 IST