लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग एवढा वाढला आहे की, रुग्णालयानंतर आता गृह अलगीकरण (होम क्वारंटाईन) होण्यासाठी रुग्णाला घरीही जागा उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. याकडे लक्ष वेधून गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये संस्थात्मक विलगीकरण केंद्र सुरु करण्याचे आदेश शाळांच्या मुख्याध्यापकांना दिले आहे. त्यामुळे आता संशयित कोरोनाचा रुग्ण शाळेमध्ये विलगीकरणात राहू शकेल.
गोंदिया जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आतापर्यंतचा आकडा २९ हजार ७१३पर्यंत पोहोचला आहे. यापैकी ५ हजार २६१ रुग्णांना गृह अलगीकरणात राहण्याचे आदेश आरोग्य विभागाद्वारे देण्यात आले आहेत. मात्र, बहुतांश कोरोना संक्रमित रुग्णांच्या घरात अलगीकरणात राहण्यासाठी जागाच नसल्याने त्यांना कुठे ठेवायचे? असा प्रश्न कुटुंबासमोर उभा ठाकला आहे.
ग्रामीण भागातील घरामध्ये राहण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने संशयित रुग्णाला शेतात क्वारंटाईन करण्यात येत असल्याची गंभीर परिस्थिती गोंदिया जिल्ह्यात आहे. ही परिस्थिती पाहून गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेताना जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांना तोंडी आदेश देत शाळांमध्ये संस्थात्मक विलगीकरण केंद्र सुरु करुन गरजूंना शाळेमध्ये ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. याविषयीचे आदेश मिळताच मुख्याध्यापकांनी शाळांची साफसफाई सुरु करुन कोरेाना रुग्णांसाठी विलगीकरण केंद्र सुरु केले आहे.