कपिल केकत
गोंदिया : रेल्वेच्या धर्तीवर आता राज्य रस्ते परिवहन महामंडळाने बसेसचे लोकेशन प्रवाशांना घरबसल्या मिळावे यासाठी बसेसचे ट्रॅकिंग सिस्टम सुरू केले असून त्यासाठी लागणारे ॲप १५ ऑगस्ट रोजी लाँच केले जाणार होते. मात्र काही अडचणींमुळे तो मुहूर्त हुकला असल्याने प्रवाशांना याव्दारे मिळणाऱ्या सोयीत अडथळा आला आहे. हे ॲप लाँच होताच प्रवाशांना बस स्थानकावर जाऊन बसची वाट बघत वेळ घालविण्याची गरज पडणार नाही. मोबाइलवर त्यांना बसेसचे लोकेशन बघता येणार असून त्यानुसार बस गाठता येणार आहे.
-----------------------------
किती बसेसना बसविली यंत्रणा?
आगार एकूण बस यंत्रणा बसविलेल्या बस
गोंदिया ८१ ८१
तिरोडा ४४ ४४
--------------------------
१५ऑगस्टचा मुहूर्त हुकला
स्वातंत्र दिनाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरा करीत असतानाच प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य रस्ते परिवहन महामंडळाकडून बस ट्रॅकिंग सिस्टमचे ॲप लाँच केले जाणार होते. मात्र त्यात काही अडचणी आल्यामुळे १५ ऑगस्टचा मुहूर्त हुकला. मात्र लवकरच हे ॲप लाँच होणार व त्यानंतर प्रवाशांना बसची वाट बघत धावपळ करण्याची किंवा ताटकळत राहण्याची गरज पडणार नाही.
-----------------------------
बस कुठे हे आधीच कळणार
सध्या आगारातील संगणकावर बसेसची स्थिती दिसून येते. तसेच प्रवाशांसाठी आगारात स्क्रीन लावण्यात आले असून त्यावर प्रवाशांना गाड्यांची स्थिती बघता येते. आता मात्र रेल्वेनुसार महामंडळ प्रवाशांना त्यांच्या मोबाइलवर बसेसचे लोकेशन बघण्याची सुविधा पुरविणार आहे. यात बस कोठे आहे हे दिसून येणार.
-------------------------
सुविधा लवकरच
राज्य रस्ते महामंडळाकडून प्रवाशांच्या सुविधेसाठी नवनवे प्रयोग केले जात आहेत. त्यातलाच हा ट्रॅकिंग सिस्टमचा प्रयोग आहे. ह ॲप आल्यावर प्रवाशांची चांगलीच सोय होणार असून रेल्वे प्रमाणेच त्यांना घरबसल्या बसेसचे लोकेशन जाणून घेता येतील.
पंकज दांडगे
आगार प्रमुख, तिरोडा