रावणवाडी : तालुक्यातील रावणवाडी परिसरात गेल्या महिन्यापासून डेंग्यू सदृश्य आजाराची साथ सुरू आहे. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत उपाययोजना राबविण्याबाबत व अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाची बात लोकमतने सतत लावून धरली. याची दखल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीश कळमकर यांनी घेवून त्वरीत उपाययोजना करण्याचे दिशानिर्देश आरोग्य केंद्राला दिले. त्यामुळे तिथे आता नव्याने बऱ्याच सोयी-सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत.रावणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दिवसेंदिवस रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील महिन्यापासून या परिसरात डेंग्यू व मलेरियाचा उद्रेक सुरू झाला. डेंग्यूने एका नागरिकाचा मृत्यू झाला. तर बऱ्याच नागरिकांनी शासकीय तसेच खासगी रूग्णालयात जावून औषधोपचार करवून घेतला. मात्र या आजारांवर प्रतिबंधात्मक उपाय करण्यास आरोग्य विभाग सक्रिय झाला नव्हता. लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीश कळमकर व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.डी. त्रिपाठी यांनी या प्रकाराची दखल घेवून आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना उपायोजना करण्याचे निर्देश दिले.रावणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा शहारे व नवीन डॉ. सागर लोखंडे त्वरीत डेंग्यूवर नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पाच-पाच कर्मचाऱ्यांचे गट निर्माण केले व डेंग्यू तसेच मलेरियाच्या रूग्णांचा शोध सुरू केला. यावेळी अनेक संशयीत रूग्ण आढळून आले. परिसरातील मुरपार, चारगाव, गोंडीटोला, गर्रा, नागरा, रावणवाडी, सावरी आदी गावांत हे गट सतत कार्यरत आहेत. आजारापासून कसा बचाव करता येईल याची माहिती प्रत्येक कुटुंबाला व्हावी म्हणून हे गट डॉ. सागर लोखंडे यांच्या निर्देशाप्रमाणे परिसरात कार्यरत आहेत. सदर आरोग्य केंद्रात बऱ्याच काळापासून वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. शिल्पा शहारे कार्यरत होत्या. मात्र आता नुकतेच नियुक्त झालेले वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर लोखंडे यांनी अल्प काळातच आरोग्य केंद्रात बऱ्याच सुधारणा करवून घेतल्या. त्यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणेबाबत नागरिकांतील गैरसमज हळूहळू कमी होवून येथे येणाऱ्या रूग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. येथील आरोग्य निरीक्षक पांडे व दिनेश यादव आपल्या चमूसह परिश्रम घेत आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञ अमित मंडल यांच्या सहकार्याने परिसरातील गावांना भेटी देवून डेंग्यूबाबत जनजागृती करीत आहेत. (वार्ताहर)
डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू
By admin | Updated: September 25, 2014 23:26 IST