चिचगड : राज्य सरकारने गोरगरिबांच्या पोटाची भूक भागविण्याच्या आणि कामानिमित्त शहरी भागात येणाऱ्या ग्रामीण जनतेला अत्यल्प दरात भोजन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शिवभोजन या महत्त्वाकांक्षी योजनेचा संपूर्ण राज्यात प्रारंभ करण्यात आला. मात्र, देवरीसारख्या आदिवासी, नक्षलग्रस्त आणि मागास तालुक्यात केवळ देवरी शहर वगळता दुसरे केंद्र शासनाला प्रचंड कालावधी लोटूनही सुरू करता आले नाही. उपतालुक्याचा दर्जा प्राप्त चिचगडसारख्या दुर्गम भागात एक केंद्र सुरू करून आदिवासी जनतेच्या पोटाची सोय करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
तालुक्यातील चिचगड हे गाव नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल व जंगलव्याप्त असून, येथे अप्पर तहसीलदार यांचे कार्यालयासह बाजारपेठ आणि इतरही शासकीय कार्यालये आहेत. सध्या कोरोना संकट काळामुळे अनेकांच्या हाताला काम नाही. परिणामी, गरीब मजुरांच्या पोटापाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येथे कामानिमित्त आणि रोजंदारीसाठी येणाऱ्या गोरगरिबांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी एक शिवभोजन केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ५६ ग्रामपंचायतीचा आणि १०७ गाववाड्यांचा डोलारा सांभाळणाऱ्या देवरी तालुक्यात केवळ एकमेव शिवभोजन केंद्र कसेबसे सुरू करण्यात आले. त्यामुळे या केंद्रांवर तालुक्यातील लोकांची भूक भागविणे शक्य नाही. शिवाय या तालुक्याचा विस्तार ५० किलोमीटरपेक्षा जास्त असून, येथे न्यायालय, उपविभागीय कार्यालयासह अनेक महत्त्वाची शासकीय कार्यालये आहेत. याशिवाय देवरी ही तालुकावासीयांसाठी एकमेव बाजारपेठसुद्धा आहे. याशिवाय दुसरे महत्त्वाचे गाव चिचगड हे असून, तशीच परिस्थिती तेेथेसुद्धा आहे. एकंदर परिस्थिती पाहता शासनाने चिचगड येथे त्वरित एक शिवभोजन केंद्र सुरू करावे आणि देवरी शहरात केंद्राची संख्या वाढवावी, अशी मागणी पुढे येत आहे.