देवरी : देवरी तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी गाव मिसपिरी ते येडमागोंदी पर्यंतच्या वीज ग्राहकांना वीज पुरवठा हा चिल्हाटी-चिपोटा येथून सुरू आहे. मात्र तो बंद करुन कडीकसा-कलकसा-गुजूरबडगा येथून विद्युत पुरवठा करण्याची मागणी मिसपिरी येथील गावकऱ्यांनी आ. सहशराम कोरोटे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
मिसपिरी-धमदीटोला येथील ट्रान्सफार्मरवरून मांगाटोला येथे सध्या वीज पुरवठा सुरू आहे. हा वीज पुरवठा कमी दाबाने होत असल्याने मांगाटोला येथील वीज ग्राहकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी मांगाटोला येथे स्वतंत्र ट्रान्सफार्मर लावण्याची मागणी केली आहे. सध्या मिसपिरी ते येळमागोदीपर्यंत वीज पुरवठा चिल्हाटी-चिपोटा येथून सुरू आहे. या मार्गावर घनदाट जंगल, झाडे व झुडपे अधिक प्रमाणात आहेत. थोड्या वाऱ्यामुळे झाडे पडून वीजतारावर पडल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे वीज ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कडीकसा-कलकसा-गुजूरबडगा येथून वीज पुरवठा करण्यात यावा. मिसपिरी-धमदीटोला येथील ट्रान्सफार्मर बदलून तो नवीन लावण्याची मागणी केली आहे. निवेदन देताना मिसपिरीचे उपसरपंच तथा काँग्रेस शेतकरी आघाडीचे तालुकाध्यक्ष जीवन सलामे, ग्रा.पं. सदस्य खेमराज वालदे, सुरेंद्र नरेटी, दीपक बडोले, विनोद कौशिक, कैलास ताराम यांचा समावेश होता.