मोठ्या प्रकरणांचा छडा : गस्तीसाठीही करतो मदतगोंदिया : वनगुन्ह्यातील घटनास्थळ, वन्यप्राण्यांच्या मृतदेहाचा शोध व शिकाऱ्यांची माहिती घेण्यास मदत करणाऱ्या गोंदियातील पीटर नावाच्या श्वानाने मोठ्या गुन्ह्यांचा शोध लावला आहे. परिणामी पीटरला इतर जिल्ह्यातही मागणी केली जात आहे.मार्च २०१३ मध्ये गोंदियाच्या वनविभागात पीटर नावाचा श्वान दाखल झाला. हा पीटर शिकाऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी वनाधिकाऱ्यांना दिशा देतो. एखाद्या प्राण्याचा मृतदेह जंगलात पडला तर त्या प्राण्याच्या मृतदेहापर्यंत पोहचविण्याचे काम पीटर करीत असतो. एप्रिल २०१३ मध्ये भंडारा येथे बिबट्याची शिकार झाली होती. त्या शिकारीतील बिबट्याचा मृतदेह शोधण्यास पीटरची मदत घेण्यात आली. तिरोडा तालुक्यात ९ फेबु्रवारी २०१४ रोजी झालेल्या चितळाच्या शिकारीत त्या चितळाला जमिनीत पुरण्यात आले होते. त्यापर्यंत नेण्याचे काम पीटरने केले. त्यानंतर या चितळाच्या प्रकरणातील आरोपीला पकडण्यात वनाधिकाऱ्यांना यश आले होते. आमगावच्या वनाधिकाऱ्यांनी पकडलेल्या बिबट्याच्या शिकारीतील आरोपींपर्यंत पोहचविण्यासाठी छत्तीसगड येथे पीटरला नेण्यात आले होते. गोंदिया तालुक्याच्या चुटीया (लोधीटोला) येथे २५ आॅक्टोबरला २०१५ ला चितळाला करंट लावून ठार करण्यात आले. त्या ठिकाणची जागा शोधण्याचे काम पीटरने केले. ३१ डिसेंबर २०१५ रोजी चंद्रपूरच्या वाघाच्या तीन बछड्याच्या मृत्यूसंदर्भात पीटरला चंद्रपूरला नेण्यात आले होते. तेथे या श्वानाने त्या वाघीणीला शोधण्याचे काम केले. देवरी तालुक्याच्या चिचगड (पिपरखारी) येथील एका व्यक्तीच्या घरात बिबट्याचे पंजे होते ते शोधण्याचे काम पीटरने एप्रिल २०१५ मध्ये केले. तसेच त्या ठिकाणी बिबट्याचे पंजे किंवा त्याचा अधिवास कुठेकुठे होता हे पीटरने वनाधिकाऱ्यांना दाखविले. रेल्वेने वन्यप्राण्यांच्या शिकारीचे कातडे जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यासाठी गोंदिया रेल्वे स्थानकावर पीटरला आणण्यात आले होते. गोंदियाच्या पौनीटोला (मुर्री) येथे बकऱ्या फस्त केल्या जात होत्या. त्या ठिकाणी वन्यप्राणी असल्याची शंका होती. त्याही ठिकाणी पीटरला ५ जुलै २०१५ रोजी नेण्यात आले होते. २३ मे २०१५ रोजी बेपत्ता असलेल्या वाघाचा शोध घेण्यासाठी पीटरला सूर्यादेव मांडोदेवीच्या जंगलात नेण्यात आले होते. २१ मे २०१५ रोजी वाघ मेल्याची शंका वनाधिकाऱ्यांना आल्यानंतर पीटरने वनाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ५ एप्रिल २०१५ रोजी बायगाव (भंडारा) येथे अडीच वर्षापूर्वीच्या वाघाच्या शिकारीचा छडा लावण्यातही त्याचा वाटा होता. केवळ प्रकरणांचा छडा लावण्यासाठीच नाही तर पीटरला जंगलात गस्त घालण्यासाठीही नेण्यात येते. वनाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नजरेतून सुटलेल्या मृत वन्यप्राण्यांची माहिती मिळविण्यासाठी पीटर मोलाची मदत करीत आहे. पीटरला हाताळण्याचे काम वनाधिकारी आनंद मेश्राम यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक राजू नागपुरे करतात. त्यांना वनरक्षक साबळे, संतोष श्रीवास्तव हे सहकार्य करतात. (तालुका प्रतिनिधी)
वन विभागाच्या ‘पीटर’ला इतर जिल्ह्यातही मागणी
By admin | Updated: January 30, 2016 02:09 IST