वीरेंद्र कटरे यांची माहिती : २६ ला काढणार मोर्चा गोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार नविन बदली धोरण राबविण्यात येणार आहे. या बदली धोरणामुळे राज्यातील जिल्हा परिषदेच्या कार्यरत शिक्षकाच्या बदल्या होणार असून काढलेल्या शासन निर्णयात दोष आहेत. प्राथमिक शिक्षकांच्या अनेक समस्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक प्राथमिक शिक्षक संघाद्वारे २६ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे यांनी दिली. प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. सदर मोर्चा संभाजीराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली प्रा.एस.डी.पाटील यांच्या मार्गदर्शनात, राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या नेतृत्वात काढण्यात येणार आहे. यावेळी विभागीय अध्यक्ष नुतन बांगरे व इतर शिक्षक उपस्थित होते. या मोर्चात विविध मागण्या केल्या जाणार आहेत. त्यात प्रामुख्याने प्रशासकीय बदल्या तालुक्यातच करण्यात याव्या, विनंतीवरून किंवा स्वेच्छेने जे शिक्षक जाण्यास तयार आहेत त्यांना बदली देण्यात यावी, अतिदुर्गम भागात जे शिक्षक स्वेच्छेने राहण्यास तयार आहेत त्यांची बदली करण्यात येऊ नये, राज्यातील १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्यांना जूनी पेंशन लागू करण्यात यावी, राज्यातील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, जि.प.शाळेतील १०० मुलामुलींना मोफत गणवेश देण्यात यावे, जि.प.,न.प., मनपा शाळेतील विद्युत बीले जि.प.कडून भरण्याची तरतूद करण्यात यावी, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांची रिक्त पदे भरण्यात यावी, प्रसूती रजेवर असलेल्या शिक्षिकांच्या रजा कालावधीत हंगामी शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळेला मुख्याध्यापक पद मान्य करावे, विधान परिषदेत दिलेल्या आश्वासनानुसार संगणक प्रशिक्षणाबाबत शासन निर्णय निर्गमित करून वसूली थांबविण्यात यावी, आंतर जिल्हा बदलीबाबत नविन धोरण जाहीर करून आपसी, एकतर्फी व पतीपत्नी एकत्रीकरण बदलीचे प्रस्ताव मान्य करण्यात यावे, विषय शिक्षकांना पदविधर वेतनश्रेणी लागू करण्यात यावी अशा अनेक मागण्यांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)
शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भातील शासन निर्णयात दोष
By admin | Updated: April 23, 2017 01:52 IST