गोंदिया : कामबंद आंदोलनात सहभागी असलेल्या ४० वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी गुरूवारी (दि.३) कार्यमुक्तीचे आदेश दिले आहेत. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अगोदरच आपले राजीनामे दिल्याने त्यांनी आदेश स्वीकार केले नसल्याची माहिती आहे. अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासन सेवेत स्थायी करणे, वेतन श्रेणी निश्चीत करणे, उच्च वेतन योजना लागू करणे, पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावणे यासह विविध मागण्यांसाठी वैद्यकीय अधिकारी संघटना गट (अ) व अस्थायी गट (ब) चे जिल्ह्यातील एकूण १८२ वैद्यकीय अधिकारी संपावर आहेत. १ जुलैपासून महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने (मॅग्मो) पुकारलेल्या या संपातर्गत त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे. यामुळे मात्र आरोग्य यंत्रणा पूर्ण पणे फिस्कटली आहे. तर या संपामुळे रूग्णांचे हाल असल्याने संपावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्वरीत कामावर रुजू न झाल्यास त्यांच्यावर मेस्मा लावण्यात येणार असल्याचा इशारा सुद्धा शासनाने दिला होता. मात्र यंदा तोडगा निघत नाही तोवर आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा पवित्रा घेऊन बसलेल्या संघटनेने (मॅग्मो) आपले आंदोलन काही मागे घेतले नाही. परिणामी येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिश कळमकर यांनी संपात सहभागी असलेल्या ४० वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्तीचे आदेश दिले आहेत. यामध्ये २९ अस्थायी तर ११ स्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी सामुहिक राजीनामे आपल्या संघटनेकडे दिले. तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेले कार्यमुक्तीचेही या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वीकारले नाही. एकीकडे शासन संपावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर मेस्मा लावण्याचा इशारा देत आहे. तर दुसरीकडे वैद्यकीय अधिकारी माघार घेत नसल्याने आता वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आंदोलन अधिकच चिघळणार असल्याची स्पष्ट चिन्हे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)
४० वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्तीचे आदेश
By admin | Updated: July 3, 2014 23:39 IST