सालेकसा : तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्राम पंचायतीपैकी एक कावराबांध ग्राम पंचायतीअंतर्गत पाचही गावात मागील १० वर्षापासून नाल्याची सफाई करून गाळ उपसण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्व नाल्या जमिनीत गडप झाल्या आहेत. परिणामी पावसाचे पाणी दरवर्षी भर रस्त्यावरुन वाहते. काही ठिकाणी घरांच्या भिंतींवर आदळून वाहते. त्यामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरण्यासोबतच घरांच्या भिंती कोसळण्याच्या वाटेवर आल्या आहेत. एकूण पाच गावांमध्ये पसरलेली ग्रामपंचायत कावराबांध येथे कावराबांध, मोहाटोला, कुनबीटोला, गोवारीटोला आणि ब्राम्हणटोला या पाच गावाचा समावेश असून एकंदरित चार वॉर्डामध्ये विभाजीत करण्यात आले आहे. एकूण चार वॉर्ड मिळून ११ सदस्यांची ग्राम पंचायत असून तालुक्यातील क्षेत्राफळाच्या तसेच लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून सुद्धा एक मोठी ग्राम पंचायत मानली जाते. त्यानुसार शासनाच्या विविध योजना सुद्धा येतात व निधी सुद्धा उपलब्ध होतो. परंतु त्या प्रमाणात गावाचा विकास झालेला दिसत नाही. आज काही अपवाद वगळता अनेक रस्ते सिमेंटीकरण झाले नाही, सांडपाण्यासाठी किंवा पावसाच्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी नाल्या नाही. काही मोजक्या ठिकाणी नाल्या गटारे बनविण्यात आल्या परंतु त्यांची कधीही सफाई करण्यात आली नाही. मागील १०-१५ वर्षापूर्वी बनलेल्या नाल्या भुई सपाट झालेल्या दिसत आहेत. अनेक ठिकाणी नाल्यांचे अस्तीत्वच राहीले नाही. दरम्यान ग्राम पंचायतवर सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्राम सेवक बदलत राहीले. परंतु मूळ समस्या जशाच्या तशा बनून आहेत. ग्रामपंचायतीचे काही पदाधिकारी फक्त आपली आर्थिक स्थिती भक्कम कशी करता येईल याच्या साठीच धावपड करीत आहेत व जन समस्येकडे सपशेल दुर्लक्ष करताना दिसत आहेत. त्यामुळे गावातील लोकांमध्ये नाराजीचे सूर निघत आहे.दरम्यान नाली सफाईबद्दल सरपंच व सचिव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी म्हटले की, नाली सफाईसाठी विशेष तरतूद नसून इतर योजनेतून समायोजन करुन रक्कमेची तरतूद करण्यात येईल. तसेच मजूर उपलब्ध झाल्यास नाली सफाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पाच गावांतील नाल्या जमिनीत गडप
By admin | Updated: June 13, 2015 00:55 IST