गोपालदास अग्रवाल : जिल्हा काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावागोंदिया : जिल्हा काँग्रेस कमिटीचा कार्यकर्ता मेळावा मंगळवार (दि.८) गुर्जर क्षत्रिय समाजवाडी येथे दिवसभर चालला. यात महाराष्ट्र विधानमंडळ लोकलेखा समिती प्रमुख, आमदार गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेसचे समर्पित कार्यकर्ते हीच पक्षाची खरी ताकद असल्याचे सांगितले.कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार अग्रवाल म्हणाले, आम्ही केलेली विकास कामे काँग्रेसचा सामान्य कार्यकर्तासुद्धा जनतेसमोर मांडण्यास सक्षम आहे. आम्ही सार्वजनिक जीवनात जवळपास २४ वर्षांपर्यंत गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात केलेल्या कार्याचे जीवंत प्रमाण आहे. राजकारण करताना आपल्या कार्यकर्त्यांना आपल्यापासून कधीही दूर समजलो नाही. त्यामुळेच कार्यकर्त्यांचे समर्थन व सहकार्य मिळून जिल्ह्यात आमची सत्ता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत व अनेक ग्रामपंचायतमध्ये स्थापित होवू शकली. ज्या कार्यकर्त्यांमुळे आम्ही सत्तेत येवू शकलो, ते कार्यकर्ते व सामान्य नागरिक यांच्या समस्या सोडविणे आपले ध्येय असायला हवे. याच कार्यकर्त्यांच्या समर्पण व त्यागामुळे काँग्रेस पक्ष विपरित परिस्थितीतही यश मिळवू शकला. केंद्र व राज्याच्या भाजप सरकारवर रोष व्यक्त करीत ते म्हणाले, अच्छे दिनच्या नावावर केंद्र सरकारने केवळ तिजोरी भरण्याचे काम केले. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर १३० डॉलर प्रतिबॅरेल होते. त्या वेळी काँग्रेस शासनाने पेट्रोलचे दर ६५ ते ७० रूपयांवर स्थिर ठेवले. आता पेट्रोलचे दर कमी करून ३५ ते ४० रूपये प्रतिबॅरेलच्या दरम्यान झाले आहे. तेव्हा केंद्र शासनाची जबाबदारी जनतेला पेट्रोल २५ ते ३० रूपये प्रतिलिटर उपलब्ध करून देण्याची आहे. मात्र आज नागरिक ६० ते ६५ रूपये प्रतिलिटर पेट्रोल खरेदी करण्यास बाध्य आहेत. आतापर्यंत देश व राज्याचे शेतकरी आत्महत्या करीत होते, आता विद्यार्थ्यांनीसुद्धा हाच मार्ग पत्करला असून हे निंदनिय आहे. यावेळी त्यांनी युवा वर्गाने मोठ्या प्रमाणात काँग्रेसशी जुळण्याचे आवाहन केले. याप्रसंगी माजी आ.रामरतन राऊत यांनी काँग्रेस शासनाच्या अनेक विकास कामांची माहिती दिली. जिल्हा महामंत्री तथा आदिवासी नेते सहेसराम कोरोटे यांनी बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांची पकड अजून मतबूत करण्याची गरज व्यक्त करून काँग्रेसच्या सर्व सेलने मिळून काम करण्याचे आवाहन केले.याप्रसंगी माजी मंत्री भरत बहेकार, जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे, अॅड.के.आर. शेंडे, टोलसिंग पवार, जि.प. सभापती पी.जी. कटरे, पं.स. सभापती स्रेहा गौतम, डॉ. योगेंद्र भगत, डॉ. नामदेव किरसान, भागवत नाकाडे, जि.प. सदस्य उषा शहारे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे तर संचालन अपूर्व अग्रवाल यांनी केले. आभार शहर अध्यक्ष अशोक चौधरी यांनी मानले. यावेळी राजेश नंदागवळी, जि.प.सभापती पी.जी.कटरे, युकाँचे लोकसभा अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल, रजनी नागपुरे, भरत बहेकार, अॅड.के.आर.शेंडे, टोलसिंह पवार, चंद्रशेखर ठवरे, झामसिंग बघेले, डॉ. योेगेंद्र भगत, राधेलाल पटले, उपस्थित होते. (प्रतिनिधी)
समर्पित कार्यकर्ते हीच काँग्रेसची खरी ताकद
By admin | Updated: March 9, 2016 02:49 IST