गोंदिया : सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या मतदानाचा हक्क बजावून मतदानाच्या प्रक्रियेत सहभाग घ्यावा या उद्देशातून निवडणूक आयोगाकडून मतदारांना मतदानासाठी आवाहन केले जात आहे. मात्र त्यानंतरही मतदानाप्रति मतदारांत अनुत्साह दिसून येत आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी असते. ही बाब लक्षात घेत यंदा निवडणूक आयोगाकडून लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रियेत जास्तीतजास्त मतदारांनी सहभाग घ्यावा यासाठी जनजागृती करण्यात आली. विशेष म्हणजे, या जनजागृती मोहिमेंतर्गत जिल्ह्यातही जिल्हा प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवून मतदानावर भर देण्यात आला. मात्र त्यानंतरही जिल्ह्यात लोकसभाच नव्हेतर, विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीत घट दिसून आली आहे. यामध्ये लोकसभा निवडणुकांच्या मतदानाची टक्केवारी बघितल्यास सन २०१४ मध्ये ७२.२१ टक्के मतदान झाले असतानाच सन २०१९ मध्ये ६७.६३ टक्के मतदानाची नोंद आहे. तर विधानसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी बघितल्यास सन २०१४ मध्ये ६६.५३ टक्के मतदानाची नोंद असताना सन २०१९ मध्ये ६४.५५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. म्हणजेच, लोकसभा निवडणुकीत ४.५८ टक्के तर विधानसभा निवडणुकीत १.९८ टक्के मतदानाची घट दिसून आली आहे.
-----------------------------
विधानसभेसाठी ६४.५५ टक्के मतदान
सन २०१९ मधील ऑक्टोबर महिन्यात घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीत गोंदिया विधानसभा क्षेत्रात ६४.५५ टक्के मतदान झाले आहे. तर सन २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत ६६.५३ टक्के मतदान झाले आहे. दोन्ही निवडणुकांतील मतदानाची टक्केवारी बघितल्यास सन २०१९ मधील मतदानाच्या टक्केवारीत घट दिसून येत आहे.
---------------------------------
लोकसभेसाठी ६७.६३ टक्के मतदान
सन २०१९ मध्ये एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकीत ६७.६३ टक्के मतदानाची टक्केवारी आहे. तर सन २०१४ मध्ये ७२.२१ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. येथेही सन २०१९ मध्ये मतदान कमी झाल्याचे दिसून येत आहे. म्हणजे, जनजागृतीचा काहीच फायदा झाला नाही, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
--------------------------
ग्रामपंचायतसाठी ७९.८६ टक्के मतदान
सन २०२० मध्ये १५ जानेवारी रोजी जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी घेण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेत ७९.८६ टक्के मतदान झाले आहे. येथे लोकसभा व विधानसभा निवडणुकांकडे बघितल्यास ग्रामपंचायत निवडणुकीकडे मतदारांचा जास्त कल दिसून आला.