आॅनलाईन बुकिंगचा फटका : प्रवेश, वाहन, कॅमेरा आदींचा दरात भरमसाट भाडेवाढकपिल केकत - गोंदियाजंगल सफारीसाठी वनविभागाने सुरू केलेली आॅनलाईन बुकींगची पद्धत अत्यंत क्लीष्ट असल्याने. तसेच लावण्यात आलेले प्रवेशावरील निर्बंध व भरमसाट भाडेवाढीचे परिणाम मात्र पर्यटकांच्या संख्येवर पडत असल्याचे दिसून येत आहे. मागील दोन-तीन वर्षांची आकडेवारी बघता लाखोंच्या घरात असलेली संख्या घटून आता हजारांवर आल्याचे दिसून येत आहे. देशी-विदेशी पक्ष्यांसह अन्य वन्य प्राण्यांचे वस्तीस्थान असलेले नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान. तसेच वाघांची गुहा म्हणून ख्यातीप्राप्त नागझिरा अभयारण्य हे पर्यटकांसाठी नेहमीच हिटलीस्टवर राहिले आहे. त्यामुळेच लाखो पर्यटक जंगल सफारीसाठी येथे दूरवरून येतात. पर्यटकांच्या आवडीची दखल घेत व वाघोबांना प्रशस्त जंगल परिसर उपलब्ध व्हावा या दृष्टीने शासनाने १२ डिसेंबर २०१३ रोजी नागझिरा व्याघ्र प्रकल्प घोषीत केला. यातून नवेगावबांध व नागझिरा असा प्रशस्त परिसर वाघोबांसाठी शासनाने मोकळा केला. यातून पर्यटकांची संख्या वाढणार असल्याचा अंदाज होता. तर पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने विविध योजना राबवीत जंगल सफारी प्रवेशासाठी आॅनलाईन बुकींग सुरू केली. १ आॅक्टोबर २०१३ पासून आॅनलाईन सफारी बुकींगची पद्धत सुरू करण्यात आली. सोबतच प्रवेश देणाऱ्या गेटवर प्रवेशासाठीही निर्बंध लावण्यात आले. पर्यटकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली आॅनलाईन बुकींगची ही पद्धत मात्र सामान्य नागरिकांच्या डोक्यावरून जात असल्याने पर्यटकांची संख्या घटत चालल्याचे दिसून येत आहे. तर गेटवर प्रवेश मिळणार की नाही याची खात्री नसल्याने याचाही परिणाम पर्यटकांच्या संख्येवर जाणवत आहे. आकडेवारी निघाय बघायचे झाल्यास, सन २०११-१२ मध्ये एक लाख तीन हजार ६८२ पर्यटकांनी नागझिरा व नवेगावबांध जंगल सफारी केली होती. सन २०१२-१३ मध्ये ५६ हजार ७८० पर्यटकांनी भेट दिली होती. तर २०१३ मध्ये व्याघ्र प्रकल्प घोषीत झाल्यावर व आॅनलाईन बुकींग सुरू झाल्यावर आतापर्यंत ३८ हजार ५७९ पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिल्याचे दिसते. एकंदर आॅनलाईन पद्धतीमुळे पर्यटकांची संख्या घटत चालल्याचे बोलणे वावगे ठरणार नाही.
पर्यटकांच्या संख्येत घट
By admin | Updated: December 3, 2014 22:51 IST