गोंदिया : राईस मिलर्स असोसिएशनने धान भरडाईच्या दरात वाढ करावी व अन्य मागण्यांना घेऊन मागील महिनाभरापासून शासकीय धानाची भरडाई करणे बंद केले आहे. यामुळे शासकीय धान केंद्रावर लाखो क्विंटल धान उघड्यावर पडले असून धान खरेदी ठप्प होण्याची पाळी आली आहे. याच विषयाला घेऊन गुरुवारी मुंबई येथे राईस मिलर्स आणि शासन यांच्यात बैठक झाली. त्यात सकारात्मक चर्चा झाली असून आता नागपूर येथे मंगळवारी होणाऱ्या बैठकीत यावर निर्णय होणार आहे.
जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केल्या जाणाऱ्या धानाची राईस मिलर्सशी करार करुन भरडाई करुन शासनाकडे तांदूळ जमा केला जातो. मात्र यंदा धान खरेदीला सुरुवात होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरी राईस मिलर्सने भरडाईसाठी शासकीय धान खरेदी केंद्रावरील धानाची उचल केली नाही. त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेले १७ लाख ४३ हजार क्विंटल धान केंद्रावर पडले आहे. परिणामी धान खरेदी ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी पुरवठा विभागाचे सचिव विलास पाटील यांनी गुरुवारी मुंबई येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीला आ.
विनोद अग्रवाल, आ.मनोहर चंद्रिकापुरे, आ. राजू कारमोरे आणि राईस मिलर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राईस मिलर्स असोसिएशनच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. मात्र या बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री उपस्थित नव्हते त्यामुळे ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे आता मंगळवारी नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात यावर बैठक होणार असून त्यात धान भरडाई आणि राईस मिलर्सच्या मागण्यांवर तोडगा काढण्यात येणार असल्याचे राईस मिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक अग्रवाल यांनी सांगितले.
......
७०० राईस मिलर्सचा सहभाग
पूर्व विदर्भात सर्वाधिक धानाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे या भागात सर्वाधिक राईस मिल आहे. याच राईस मिलर्ससह करार करुन शासन शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची भरडाई करुन शासनाकडे तांदूळ जमा करते. पण मागील तीन वर्षांपासून धानाच्या वाहतुकीचे भाडे आणि धान भरडाईचे दर निश्चित झाले नाही. त्यामुळे या मागण्यांना घेऊन ७०० राईस मिलर्सनी यंदा शासकीय धानाची भरडाई करणे बंद केले आहे. त्यामुळे पूर्व विदर्भातील शासकीय धान खरेदी अडचणीत आली आहे.
.....