१४ टेबलवर मतमोजणी : सकाळी ८ वाजता सुरूवात, प्रशासनाची जय्यत तयारीगोंदिया : तेराव्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील चारही मतदारसंघात ६९.११ टक्के मतदान झाले. यात चारही मतदार संघातील ५४ उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात यंत्रबद्ध झाले. त्यांच्या भाग्याचा फैसला रविवारी होणाऱ्या मतमोजणीने होणार आहे. ५४ पैकी ४ भाग्यवान कोण ठरतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. रविवारी (दि. १९) सकाळी ८ वाजतापासून चारही विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीला सुरूवात होणार आहे. अर्जुनी/मोरगाव मतदारसंघासाठी मतमोजणीच्या २२ फेऱ्या, तिरोडा मतदार संघासाठी २१ फेऱ्या, गोंदिया मतदार संघासाठी २५ फेऱ्या आणि आमगाव मतदारसंघासाठी २२ फेऱ्या, अशा एकूण मतमोजणीच्या ९० फेऱ्यांमध्ये निवडणुकीचा निकाल लागणार आहे. दुपारी २ वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगाव मतदारसंघात ३०६, तिरोडा मतदारसंघ-२८९, गोंदिया-३३७, आमगाव-३०२ अशा एकूण १२३४ मतदान केंद्रांवर ७ लाख ६ हजार ८३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ३ लाख ५१ हजार ३१४ पुरुष आणि ३ लाख ५५ हजार ५१८ स्त्रीया आणि एका तृतीयपंथीयाचा समावेश आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतमोजणी केंद्रांवर १४ टेबल लावण्यात आले आहेत. प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहायक व एक सुक्ष्म निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी प्रक्रियेचे निरीक्षण करण्यासाठी निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निरीक्षक संबंधित मतदारसंघाच्या मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित राहतील. मतदारसंघनिहाय मतमोजणी पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात अर्जुनी/मोरगाव-१७, तिरोडा-१७, गोंदिया-१७ आणि आमगाव-१७, मतमोजणी सहायक अर्जुनी/मोरगाव-१८, तिरोडा-१८, गोंदिया-१८ आणि आमगाव येथे १७ पर्यवेक्षक, तसेच सुक्ष्म निरीक्षक अर्जुनी/मोरगाव-१९, तिरोडा-१९, गोंदिया-१९ आणि आमगाव-१९ असे एकूण २१६ मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक आणि सुक्ष्म निरीक्षक मतमोजणीचे काम करतील.चारही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेला सकाळी ८ वाजता सुरूवात होईल. मतमोजणीच्या ठिकाणी होणारी गर्दी पाहता तिथे कडक सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली आहे. शिवाय प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी माध्यम कक्षाचीही व्यवस्था राहणार आहे. तिरोडा मतदार संघात २० फेऱ्या आणि एक पोस्टल मतांची फेरी अशा एकूण २१ फेऱ्या होणार आहेत. या मतदार संघात १४ उमेदवार भाग्य आजमावत आहेत. अर्जुनी/मोरगावात जय्यत तयारी अर्जुनी/मोरगाव : विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आता मतदारांना निकालाची उत्सुकता लागली आहे. रविवारी सकाळी ८ वाजतापासून स्थानिक कृषी उत्पन्न बाजारा समितीच्या आवारात मतमोजणीला सुरूवात होणार आहे. यादृष्टीने प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणीच्या एकूण २२ फेऱ्या होणार आहेत. मोजणी कार्यात ३४ कर्मचारी व प्रत्येक टेबलवर १ सुक्ष्म पर्यवेक्षक राहणार आहेत. याशिवाय संगणक विभाग व आणखी कक्ष तयार करण्यात आले आहेत. यासाठी पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.
आज होणार भाग्याचा फैसला
By admin | Updated: October 18, 2014 23:26 IST