शेंडा/कोयलारी : सडक/अर्जुनी तालुक्यातील शेंडा (कोयलारी) येथे देना बँकेची शाखा आहे. आठवड्यातून फक्त मंगळवार व शुक्रवार असे दोनच दिवस देवाण घेवाण करण्यासाठी ठरलेले आहेत. येथील अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराने ग्राहक त्रस्त झाले आहेत.कोणत्याही बँकेची देवाणघेवाण करण्याची वेळ दुपारी ११ ते ३ वाजतापर्यंत असते. परंतु येथील बँक ३ वाजता उघडते हे विशेष. शुक्रवारला (दि.२६) ग्राहक ११ वाजतापासून देवाणघेवाण करण्यासाठी बँकेच्या समोर उघड्यावर कर्मचाऱ्यांची वाट पाहात होते. दुपारचे ३ वाजले तरी कर्मचारी तेथे पोहोचलेच नाही. यामुळे संतापलेले ग्राहक निघून गेले. यावरून बँकेचे कर्मचारी वेळेला किती महत्व देत असतील याची प्रचीती येते. सदर बँकेचे कर्मचारी सडक/अर्जुनीवरुन ये-जा करतात. वेळेवर बँक उघडत नसल्याच्या तक्रारी ग्राहकांच्या आहेत. मनमर्जीने येणे व मनमर्जीने जाणे हे नित्याचेच झाले आहे. या अगोदर येथील बँक पूर्णवेळ नियमित सुरू राहायची. परंतु देवाणघेवाण होत नसल्याचे कारण पुढे करुन आठवड्यातून दोनच दिवस बॅक सुरू ठेवण्यात येते.बँकेचे कर्मचारी आठवड्यातून दोनही दिवस वेळेवर येत नसतील तर त्या बँकेचा काय उपयोग, असा सवाल ग्राहक उपस्थित करीत आहेत. कर्मचारी ग्राहकांशी अभद्र व्यवहार करीत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. संबंधित अधिकाऱ्याने त्या कर्मचाऱ्यांना वठणीवर आणावे तसेच वेळेनुसार बँकेचे व्यवहार करण्याची तंबी कर्मचाऱ्यांना द्यावी, अशी मागणी परिसरातील ग्राहकांकडून होत आहे. (वार्ताहर)
देना बँकेचा भोंगळ कारभार
By admin | Updated: September 29, 2014 00:46 IST