मुन्ना नंदागवळी ल्ल बाराभाटीजवळील बोळदे बीट या जंगलातील उंच पहाडीवर असलेल्या कोकणाई मातेच्या देवस्थानात नवरात्र यात्रा सुरू असून देवीच्या दर्शनार्थ दूरवरून आलेल्या भाविकांची गर्दी दिसून येत आहे. जंगलात असलेल्या या देवस्थानाच्या विकासासाठी मंदिर समितीची धडपड सुरू असून भाविकांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जागृतदेवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मातेच्या मुर्तीची पहाडावरील गुफेतील वाहत्या झऱ्याजवळ स्थापना करण्यात आली आहे. या डोंगरावरील सात एकर जागा मंदिर समितीच्या नावाने आहे. मातेच्या दर्शनासाठी जाताना अर्ध्या रस्त्यावर पायऱ्या असून अर्धा कच्चा रस्ता आहे. देवस्थानात दोन सभामंडप असून याठिकाणी भाविक स्वयंपाक करतात. दरवर्षी नवरात्रीत येथे यात्रा भरत असून अवघ्या विदर्भातून भाविक येथे आपल्या कामना पूर्तीसाठी येतात. त्यामुळे दिवसेंदिवस येथे येणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. दर मंगळवारी येथे पूजा-अर्चना होत असून येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी रस्ता तयार करण्याची मागणी मंदिर समिती करीत आहे. शिवाय या देवस्थानच्या विकासासाठी देवस्थाना समितीची धडपड सुरू आहे. यात्रेचे आजचे स्वरूप बघता भविष्यात ही यात्रा एक वेगळे चित्र जगासमोर तयार करणार असे समितीचे अध्यक्ष छोटू मारगाये वसचिव केशव किरसान यांनी सांगीतले.
कोकणाई मातेच्या दर्शनार्थ भाविकांची गर्दी
By admin | Updated: October 20, 2015 02:31 IST