सहा शेतकऱ्यांनी केली होती तक्रार : फक्त पाच टक्के बियाणे उगवले गोंदिया : बोगस बियाणे पुरवठा करुन शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्या यशोदा हाईब्रिड सिड्स प्रा.लि. हिंगणघाट याच्या संचालकाविरुद्ध गोंदिया ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची फसवणुक झाली मात्र बोटावर मोजण्या इतके शेतकरी तक्रार करण्यास पुढे आल्याने जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक यांनी या प्रकरणात रस घेवून नमुने घेणे, चाचणीसाठी पाठविणे व आलेल्या अहवालानुसार स्वत: फिर्यादी होवून पोलीसात तक्रार करणे या पर्यंतची कार्य केले. जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक काशिनाथ नारायण मोहाडीकर (५२) हे ९ जून २०१६ रोजी गराडे कृषी सेवा केंद्र पांढराबोडी येथे दुपारी २.४५ वाजता साठा पुस्तका व बिल तपासणीकरिता गेले होते. तपासणी करित असताना यशोदा हाईब्रिड सिड्स प्रा.लि. यांचे जयश्रीराम गोल्ड वाणाचे बियाणे बोगस असल्याची शंका त्याना आली. त्या केंद्रातील नमुने त्यांनी घेवून तपासणी करिता १० जून २०१६ ला बिज परिक्षण प्रयोगशाळा नागपूर येथे विश्लेषणाकरिता पाठविण्यात आले. त्या प्रयोगशाळेने या बियाणांची तपासणी करुन याचा अहवाल ७ जुलै २०१६ ला कृषी अधीक्षक कार्यालय गोंदिया यांना दिला. त्या अहवालात जयश्रीराम गोल्ड वाणाचे भात बियाणे बोगस असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने या संदर्भात मोहाडीकर यांंनी गोंदिया ग्रामीण पोलिसात तक्रार केली. या प्रकरणात आरोपी प्रदीप माणिकराव पाटील (३८) रा. हिंगणघाट, जि. वर्धा याच्याविरुद्ध जिवनावश्यक वस्तु अधिनियम कलम ३, ७, (९), ६, १३५, ८ (अ) व भादंवि कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी) या शेतकऱ्यांचे नोंदविले बयाण पांढराबोडी येथील गराडे कृषी केंद्रात तिरोडा येथील हिंदुस्थान एग्रो क्लिनिक येथून बियाणे आणण्यात आले होते. या गराडे कृषी केंद्रातून शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले. परंतु ती बियाणे उगवलीच नाही अशी तक्रारही कृषी केंद्र चालक व कृषी अधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी केली होती. यापैकी तक्रार करून कृषी अधिकाऱ्यांना बयाण देण्यासाठी पुढे आलेल्या शेतकऱ्यांमध्ये लोहारा येथील लखनलाल ढेकवार, ढाकचंद नागपुरे, गुलाबसिंह दमाहे, बेनीलाल दमाहे, चंद्रहास डहारे, धनलाल लिल्हारे या शेतकऱ्यांचा समावेश आहे.
बोगस बियाणे प्रकरणात यशोदा हायब्रिड सिड्सवर गुन्हा
By admin | Updated: July 28, 2016 00:15 IST