पाच लाखांची मागणी : प्राथमिक शिक्षक समितीचे निवेदन अर्जुनी मोरगाव : अंशदायी पेन्शन योजनाधारक कर्मचाऱ्यांचा शासकीय सेवाकाळात मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांचा मदतनिधी देण्यात यावा, यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गोंदियाने पुढाकार घेतला आहे. हा मुद्दा ११ सप्टेंबर रोजी लाखांदूर येथे होणाऱ्या पतसंस्थेच्या सभेत चर्चिला जाणार आहे. शिक्षक समितीने पतसंस्थेला शुक्रवारी निवेदन दिले आहे. प्राप्त माहितीनुसार, १ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. सेवाकाळात कष्ट करुन मिळणारी सेवानिवृत्ती राशी ही कर्मचाऱ्यांसाठी शिदोरी असते. या भरवशावर निवृत्त कर्मचारी आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह, शिक्षण, विवाह व इतर कार्य पार पाडतात. मात्र शासनाने मूळ पेन्शन योजना बंद करुन अंशदायी पेन्शन योजना लागू केली आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना या धोरणामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. मृत कर्मचाऱ्यांना विशेष शासकीय लाभ मिळत नाही. त्यांचे कुटुंब असुरक्षित राहते. यासाठी मृत अंशदायी पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या वारसांना जि.प. प्राथमिक शिक्षक तसेच इतर शासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्थांनी पाच लक्ष रुपये मृत्यू मदत निधी द्यावा. तसा ठराव ११ सप्टेंबर रोजी लाखांदूर येथे आयोजित पतसंस्थाच्या आमसभेत द्यावा, असे निवेदन जि.प. व शासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्था गोंदिया- भंडाराचे अध्यक्ष केशव बुरडे यांना देण्यात आले. या वेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे पदाधिकारी विनोद बडोले, रमेश गहाणे, कैलास हांडगे, सिद्धार्थ खोब्रागडे, राजेश गटगडे उपस्थित होते. अंशदायी पेन्शन योजनेत समाविष्ट असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ११ सप्टेंबर रोजी लाखांदूर येथील आमसभेत उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षक समिती गोंदियाने केले आहे. (तालुका प्रतिनिधी)
मृत अंशदायी पेन्शन धारकांना पतसंस्थांनी मदतनिधी द्यावा
By admin | Updated: September 11, 2016 00:30 IST