परीक्षा मंडळाचे प्रमुख बॅनर्जी व परीक्षा मंडळाच्यावतीने घेण्यात आलेला हा नवोपक्रम होता. या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य शेख यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले होते. यात दहावीच्या सर्व वर्गांना अध्यापन करणारे शिक्षक एकत्र येऊन आपापल्या विषयाचे महत्वपूर्ण ज्ञान देताना शिक्षकांनी तज्ञ मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली. बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. त्यातच कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्या अनुषंगाने अभ्यासक्रम पूर्ण कसा करावा, पेपर कसा सोडवावा, अभ्यास लक्षात ठेवण्याच्या सहज क्लुप्त्या, जास्त भारांश कोणत्या पाठावर आहे याचे सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले. पाहिल्या दिवशी सत्र-१ मध्ये गणित बॅनर्जी यांनी घेतले तर सत्र-२ मध्ये इंग्रजी विषयाच्या पेपरवर लोकेश कटरे यांनी प्रकाश टाकला. तर डी. के. रहांगडाले यांनी व्याकरणावर भर दिला. दुसऱ्या दिवशी विज्ञान व तंत्रज्ञान आणि इतिहास हे विषय घेण्यात आले. इतिहासाचा अभ्यास सोप्या पद्धतीने कसा करावा जुगनहाके यांनी सांगितले. यादव यांनी पेपर कसा सोडवावा याचे मार्गदर्शन केले. तिसऱ्या दिवशी गणित भाग-२ मध्ये ए.ए.बॅनर्जी, एन.आर.रामटेके व यू.जी.कापगते यांनी भौमितिक आकृत्या व त्यावर आधारित प्रश्न सहज कसे लक्षात ठेवावे हे सांगितले. मराठी विषय व्ही.एस.नेवारे यांनी घेतला. भूगोल विषयावर अंबुले यांनी आलेख व त्यावर प्रश्न कसे तयार करावे, उत्तर लिहिण्याची पद्धत इच्यादीवर मार्गदर्शन केले. एकंदरीत सर्व विषयावर चर्चा झाली व सर्व शिक्षकांच्या अध्यापनाचा फायदा झाला व याचा सकारात्मक प्रभाव पेपर सोडविण्यासाठी निश्चित रूपात होईल असे मत विद्यार्थ्यांनी मांडले. प्राचार्य शेख यांनी, सर्व शिक्षकांचे कौतुक केले व हा उपक्रम छान राबविला व आता हार्डवर्कपेक्षा स्मार्टवर्कची आज गरज आहे, असे प्रतिपादन केले. संचालन व्ही. एन.चौधरी यांनी केले. प्रास्ताविक व्ही. एस. नेवारे यांनी मांडले. आभार ए. ए. बॅनर्जी यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
‘अभ्यासक्रम अभिमुख’ कार्यक्रमाचा समारोप ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:27 IST