गोंदिया : १५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पंचायत समितीमधील कंत्राटी अभियंत्यास जिल्हा सत्र न्यायालयाने चार वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. मंगळवारी (दि. ३०) शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव ओमप्रकाश चुन्नीलाल डहाट (वय ४८) असे असून, त्यांनी ७ ऑगस्ट २०१५ मध्ये ही लाच स्वीकारली होती.
गोंदिया पंचायत समितीमध्ये कार्यरत असताना कंत्राटी कनिष्ठ अभियंता (पॅनल तांत्रिक अधिकारी) ओमप्रकाश डहाट यांनी विहीर बांधकामाचे बिल काढण्यासाठी एका लाभार्थ्याकडून १५०० रुपयांची मागणी केली होती. ती रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना ७ ऑगस्ट २०१५ रोजी रंगेहात पकडले होते. शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७,१३(१)(ड) सहकलम १३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी मंगळवारी (दि. ३०) जिल्हा सत्र न्यायाधीश-१ आर. बी. शुक्ला यांनी सुनावणी केली.
यात त्यांनी, कलम ७ मधील अपराधाकरिता चार वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास. तसेच कलम १३ (१)(ड) मध्ये चार वर्षे सश्रम कारावास व पाच हजार दंड तसेच दंड न भरल्यास दोन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकारी वकील ॲड. कैलास खंडेलावाल यांनी नऊ साक्षीदार तपासले. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक दिलीप वाढणकर यांनी केला आहे. या प्रकरणासाठी पोलीस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे व पोलीस हवालदार प्रदीप तुळसकर यांनी सहकार्य केले.