नगर परिषदेत कामबंद : समर्थनार्थ रामनगर ठाण्यात कर्मचाऱ्यांची गर्दीगोंदिया : आठ दिवसांपूर्वीच नगर परिषदेवर स्वीकृत नगरसेवक म्हणून गेलेले शिव शर्मा यांनी गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुमंत मोरे यांना मारहाण केल्याच्या आरोपाने नगर परिषद वर्र्तुळात संतापाची लाट उसळली. या प्रकाराने कर्मचारी काम बंद आंदोलन करीत मुख्याधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ रामनगर पोलीस ठाण्यात पोहोचले. हा प्रकार बुधवारी दुपारी घडला. मात्र वृत्त लिहीपर्यंत पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता. मुख्याधिकारी मोरे यांनी सांगितले की, त्यांना नगराध्यक्ष कशिश जायसवाल यांनी चर्चेसाठी त्यांच्या हॉटेल कस्तुर येथे बोलावले होते. जायसवाल यांच्या मालकीच्या त्या हॉटेलमध्ये मुख्याधिकारी मोरे नेहमीप्रमाणे गेले. ते चर्चा करीत असताना स्वीकृत नगर परिषद सदस्य शिव शर्मा यांनी मुख्याधिकाऱ्यांवर ते सहकार्य करीत नसल्याचा आळ घेत मारपीट केली. यावेळी नगराध्यक्ष जयस्वाल यांच्यासोबत नगरसेवक घनश्याम पाणतावने हेसुद्धा उपस्थित होते. या प्रकारामुळे मुख्याधिकारी मोरे यांनी थेट रामनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या घटनेची माहिती नगर परिषदेत पोहोचताच कर्मचाऱ्यांनी या घटनेबद्दल रोष व्यक्त करीत कामबंद आंदोलन सुरू केले. एवढेच नाही, तर त्यांनी काही विभागांना कुलूप ठोकून मुख्याधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ रामनगर पोलीस ठाण्याकडे मोर्चा वळविला. जोपर्यंत नगरसेवक शर्मा यांना अटक केली जात नाही तोपर्यंत तेथून हटणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली होती. मात्र सायंकाळपर्यंत या प्रकरणी समझोता घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू होते. नगरसेवक शिव शर्मा किंवा घनश्याम पाणतावणे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही. त्यामुळे नेमका काय प्रकार झाला, हे त्यांच्याकडून कळू शकले नाही. (जिल्हा प्रतिनिधी)नगर परिषदेत दबावाचे राजकारण?मुख्याधिकाऱ्यांवर यापूर्वीसुद्धा अशा पद्धतीने हल्ल्याचे प्रकार घडले आहेत. भाजपाच्या नगरसेवकांनी आधीपासूनच मुख्याधिकारी विकास कामात सहकार्य करीत नसल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे काही नगरसेवकांकडून आणि न.प.पदाधिकाऱ्यांकडून चुकीच्या गोष्टीसाठी प्रशासकीय यंत्रणेवर दबाव आणल्या जात आहे. त्यामुळे आजच्या घटनेमागील कारण भाजपा नगरसेवकांमध्ये असलेला असंतोष असल्याचे बोलले जात आहे. कट रचून मुख्याधिकाऱ्यांना नगराध्यक्षांच्या हॉटेलात बोलविण्यात आले आणि तिथे त्यांना धमकावून मारहाण केल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. आठवड्याभरापूर्वीच स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त झालेले शिव शर्मा हे नगराध्यक्ष कशिस जयस्वाल यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. नगर परिषदेच्या कामातील त्यांचा वावर आणि दबाव अनेकांच्या डोळ्यात खुपत असल्याचे बोलले जाते.
मुख्याधिकाऱ्यांना नगरसेवकाची मारपीट
By admin | Updated: June 11, 2015 00:44 IST