गोंदिया : कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यानुसार, जिल्ह्यात लसीकरण मोहीम जोमात राबविली जात असून आता एक लाखांच्या वर नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. मात्र, अशातच आता जिल्ह्यातील लसींचा साठाच संपल्याने मंगळवारपासून (दि.६) जिल्ह्यातील काही केंद्रांवर लसीकरणाला ‘ब्रेक’ लागणार आहे.
१६ जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरणांतर्गत जिल्ह्याला आतापर्यंत वेळोवेळी लसींचा पुरवठा करण्यात आल्याने खंड न पडता लसीकरण सुरू आहे. त्यात आता कोरोनाचा उद्रेक वाढल्याने शासनाने जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यावर जोर दिला असून सुटीच्या दिवशीही लसीकरण करण्याचे आदेश दिले आहेत.आदेशांचे पालन करत जिल्ह्यात जोमात लसीकरण मोहीम राबविली जात असून परिणामी रविवारी (दि.४) एकूण १०१९०७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. सोमवारी (दि.५) जिल्ह्यात डोसेसचा तुटवडा जाणवला. विशेष म्हणजे, शहरातील मुख्य केंद्र असलेल्या केटीएस व बीजीडब्ल्यू रूग्णालयात प्रत्येकी सुमारे ७० डोसेस उपलब्ध होते व तेही संपले आहेत. यामुळे मंगळवारी केटीएस व बीजीडब्ल्यू रूग्णालयात मंगळवारी लसीकरण होणार नाही खात्रीलायक माहिती आहे तर जिल्ह्यातील काही लसीकरण केंद्रांवर माहितीनुसार सुमारे १५०० डोस उपलब्ध होते व त्यामुळे तेथे लसीकरण होऊ शकणार आहे. मात्र, तेही एक दिवसापेक्षा जास्त होणार नाही अशी स्थिती आहे.
-----------------------------------
२.७८ लाख डोसेसची केली मागणी
जिल्ह्यात अविरत पणे व जोमात सुरू असलेल्या लसीकरणाला बघता त्यात खंड पड़ू नये यासाठी आरोग्य विभागाने आरोग्य संचालकांना पत्र पाठवून २७८८०० डोसेसची मागणी केली आहे. मागणीनंतर जिल्ह्याला एवढे डोस मिळाल्यास अखंडितपणे जिल्ह्यात लसीकरण करता आले असते. मात्र, आता डोसेसचा पुरवठा न झाल्याने मंगळवारी लसीकरणात खंड पडणार असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, वृत्त लिहेपर्यंत लसींच्या पुरवठ्याला घेऊन आरोग्य विभागाकडे काहीच माहिती उपलब्ध झाली नव्हती.
.........
लसींची मागणी पुरवठा केव्हा?
जिल्हा आरोग्य विभागाने कोरोना लसीकरणासाठी जवळपास तीन लाख कोरोना डोसची मागणी केली होती. मात्र, अद्यापही लस उपलब्ध झाल्या नसल्याने जिल्ह्याला लसीचा पुरवठा केव्हा होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.