अर्जुनी मोरगाव
: स्थानिक ग्रामीण रुग्णालयात होत असलेल्या कोरोना चाचण्या बंद करून त्या कोविड केअर सेंटरमध्ये होत असल्याचा प्रकार अत्यंत क्लेशदायक आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी माजी जि. प. सदस्य किरण कांबळे यांनी केली आहे.
अर्जुनी मोरगाव येथील कोरोना चाचण्या ग्रामीण रुग्णालयात होत होत्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कुठलेही आदेश नसताना त्या कोविड केअर सेंटरमध्ये हलविण्यात आल्या. जिथे कोविडचे रुग्ण असतात, तिथे बाहेरच्या कुणालाही जाण्याची मनाई असते. मग तिथे कोरोना चाचण्या उपलब्ध करून देण्याची गरज का? हे तर कोरोनाला आमंत्रण देण्यासारखे आहे. ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेले कोरोना चाचणी केन्द्र एकाएकी बंद कसे करण्यात आले. कोविड केअर सेंटर जिथे कोविडचे रुग्ण असतात, अशा ठिकाणी स्वतः जाऊन चाचणी करण्यास लोक धजावत नाहीत. त्यामुळे याचा कोरोना चाचण्यांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणाची वरिष्ठांनी चौकशी करण्याची मागणी कांबळे यांनी केली आहे.