लाेकमत न्यूज नेटवर्कदेवरी : कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. जिल्ह्यात दररोज तीन आकडी रुग्णसंख्येची भर पडत आहे. अशात मंगळवारपासून शासनाने कडक निर्बंध लागू केले आहे. याच आदेशाची अंमलबजावणी करीत देवरी तहसीलदार आणि पोलीस विभागाने विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना पकडून त्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यास सुरुवात केली. बुधवारी पहिल्याच दिवशी २६ जणांना पकडून त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात सहा जण पॉझिटिव्ह आल्याने त्यांची कोविड केअर सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली. ब्रेक द चेन अंतर्गत नवीन निर्बंध लागू करण्यात आले. बुधवारपासून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुद्धा सकाळी ११ वाजता पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली. तसेच निर्बंध अजून कडक करण्यात आले. मात्र यानंतरही रस्त्यावरील गर्दी कमी होत नसून विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामुळे कोरोनाच्या संसर्गात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हीच बाब लक्षात घेत देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे, ठाणेदार व आरोग्य विभाग यांनी या विरुद्ध संयुक्त मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेंतर्गत विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना पकडून त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. बुधवारी (दि. २१) २६ जणांवर कारवाई करण्यात आली. यापैकी ६ जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांची रवानगी कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात आली. या धडक कारवाईमुळे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी करण्यास मदत होणार आहे. ही मोहीम तहसीलदार विजय बोरुडे यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आली.