बिरसी-फाटा : उन्हाळ्याची चाहूल लागताच थंड पाणी पिण्यासाठी गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाची मागणी वाढते. यंदा तरी काहीसा दिलासा मिळणार असल्याचे चित्र सुरुवातीला दिसत होते. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात माठ खरेदी करण्यास कोणीही येत नसल्याने गरिबांचा फ्रीज ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहे.
यावर्षी मार्च महिना संपला तरी, पाहिजे त्या प्रमाणात माठ विकले न गेल्याने कुंभार समाज मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. मागीलवर्षी उन्हाळ्याचा हंगाम सुरू होताच कोरोनामुळे लाॅकडाऊन करण्यात आले होते. यामुळे कुंभार अडचणीत सापडले होते. यावर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला विक्री सुरू झाली. फ्रीजचे पाणी पिण्याऐवजी ग्रामीण भागात माठातील पाण्याला अधिक पसंती देतात. मात्र जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत असल्याने नागरिक घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे व्यवसाय होईल की नाही, याची चिंता कुंभार समाजाला आहे. गतवर्षीही कोरोनामुळे माठ विक्रीवर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे कुंभार समाजाला आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. शासकीय स्तरावर दखल घेऊन आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी कुंभार समाज बांधवांकडून केली जात आहे.