गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून गोंदिया तालुक्यात दररोज दीडशे बाधितांची भर पडत असल्याने हा तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. कोरोना संसर्गाचा वाढता वेग पाहता जिल्हावासीयांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. अन्यथा याकडे दुर्लक्ष करणे जिल्हावासीयांनाच महागात पडू शकते. त्यामुळे जिल्हावासीयांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
जिल्ह्यात सोमवारी (दि.५) २५५ कोरोना बाधितांची भर पडली तर ९६ बाधितांनी कोरोनावर मात केली. गोरेगाव येथील एका ७० वर्षीय आणि गोंदिया येथील ४० वर्षीय रुग्णांचा शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सोमवारी आढळलेल्या २५५ बाधितांमध्ये सर्वाधिक १६२ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा २८, गोरेगाव १४, आमगाव १९, सालेकसा १, देवरी १, सडक अर्जुनी ४ व बाहेरील राज्यातील २ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांपाठोपाठ मृतकांची संख्या सुद्धा वाढत आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या काळजीत अधिक भर पडली आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०७९३० बाधितांचे नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ९४१०० नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोना बाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत ९२५९५ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले आहेत. त्यापैकी ८५२१४ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १७२५९ कोरोना बाधित आढळले असून यापैकी १५४४५ बाधितांनी मात केली आहे. सद्यस्थितीत १६४० कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ३५७ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
..............
रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. पाच दिवसांच्या कालावधीत १२१० रुग्णांची नोंद झाली आहे. तर मृतकांची संख्या सुद्धा वाढत आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या काळजीत भर पडल्याचे चित्र आहे.
......
कोरोना लसीकरणाचा १ लाखांचा टप्पा पार
कोरोनाचा वाढता संसर्ग कमी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यातच आता लसीकरणावर भर दिला जात असून जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख १० हजारावर नागरिकांना कोरोना लसीकरणाचा टप्पा पूर्ण झाला आहे.
............