अर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील झाशीनगर गावात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. या गावात २५ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी झाशीनगर या संपूर्ण गावाला कोअर झोन तसेच चुटिया व भसबोडन या गावांना बफर झोन म्हणून मंगळवारी (दि.३०) घोषित केले आहे.
झाशीनगर या गावातील आदिवासी विद्यालयात विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. गावातही चाचण्या झाल्या यात २५ बाधित असल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी सोनाले यांनी या गावाला भेट दिली. तहसीलदार विनोद मेश्राम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ विजय राऊत, वैद्यकीय अधिकारी सुरेंद्र खोब्रागडे, डॉ प्रवीण दखणे,चिचगडचे सहा. पोलीस निरीक्षक अतुल तावडे, तलाठी सोना मोहूर्ले, ग्रामसेवक एस. ए. खडसे, सरपंच आशा गदवार, सदस्य संजीवकुमार गुरनुले उपस्थित होते. यावेळी गावसमिती तयार करण्यात आली.
प्रतिबंधित गावातील सर्व रस्ते तत्काळ प्रभावाने बंद करण्यात यावे, क्षेत्राबाहेरील नागरिकांना प्रतिबंधित क्षेत्रात जाणे-येणे करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा पुरविण्यात याव्यात असे आदेश सोनाले यांनी दिले आहेत.