काचेवानी : ग्राहकाला तात्पुरते वीज मीटर द्यावे असे आदेश गोंदिया ग्राहक मंचचे दिले. मात्र विद्युत विभागाचे अधिकारी सदर आदेशाला न जुमानता नागपूर ग्राहक मंचात अपिल करून एका वीज ग्राहकाला त्रास देत आहेत.विद्युत कंपनीचे उपकार्यकारी विभाग तिरोडा अंतर्गत सहायक अभियंता गंगाझरीच्या हद्दीत येणाऱ्या बरबसपुरा येथील मनोहर गोपाल कनोजे यांच्या घरची वीजचोरी तिरोड्याचे तत्कालीन उपकार्यकारी अधिकारी ए.व्ही. तुपकर यांनी पकडली होती. कनोजे यांचा वीज पुरवठा खंडित करून ८२ हजार रूपये व कंपाऊंड चार्ज ३० हजार रूपये असे एकूण एक लाख १८ हजार रूपयांचे बिल आकारले होते. याविरूद्ध कनोजे यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच गोंदिया येथे (प्रकरण-सीसी/१४/७० दि.१८/१०/२०१४) नुसार दाखल केले.कनोजे यांनी राहत्या घरी तात्पुरती विजेची सोय करण्याचे निवेदन न्यायमंचाला दिले होते. यावर तात्पुरत्या मीटरसाठी १५ दिवसांच्या आत वीज कंपनीकडे ३५ हजार रूपये भरण्याचे २६ डिसेंबर २०१४ रोजी न्यायमंचाने सुचविले होते. त्या आदेशाची प्रत (जिग्रामंगो/आस्था/०१/एमए/०९/२०१४) जिल्हाधिकारी कार्यालय गोंदियाला २ जानेवारी २०१५ रोजी देण्यात आली. ही आदेश प्रत घेवून डिमांड भरण्यासाठी उपकार्यकारी अधिकारी, उपविभाग कार्यालय तिरोडा येथे गेल्यावर सतत दोन महिने टालवाटालव करण्यात आली. यानंतर मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विचारण्यासाठी गेले असता सदर प्रकरणाची अपिल कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता गोंदिया यांनी कंपनीला ३५ हजार रूपये मान्य नसल्याने नागपूर ग्राहक न्यायमंचात दाखल करण्यात आल्याचे सांगितले. (वार्ताहर)वीज अधिकारी बनवतात ग्राहकांना मूर्खवीज कंपनीचे अधिकारी व कर्मचारी ग्राहकांत दहशत पसरविण्यासाठी सहायक अभियंत्यापासून ते अधीक्षक अभियंत्यापर्यंत एक दुसऱ्याच्या संगनमत करतात. ग्राहकांना त्रास देण्यासाठी व मूर्ख बनविण्यासाठी एक-दुसऱ्या अधिकाऱ्यांची नावे सांगतात, असे कनोजे यांनी लोकमतला सांगितले. न्यायमंचाने तात्पुरत्या मीटरसाठी ३५ हजार रूपये भरून घ्यावे, असे आदेश दिले. मात्र वीज अधिकाऱ्यांनी सदर आदेशाला केराची टोपली दाखविली. तसेच ग्राहकाला अंधारात ठेवून नागपूर न्यायमंचात अपिल केली. तिरोडा उपकार्यकारी अभियंता जस्मातिया, कार्यकारी अभियंता बी.जी. भवरे यांनी ग्राहक न्यायमंचाला वीज चोरी कलम १३५ चे निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत, असे सांगितले. त्यामुळे न्यायदेवतेपेक्षा वीज अधिकारी स्वत:ला वरचढ समजत आहेत, असा आरोप कनोजे यांनी केला आहे. वीज अधिकाऱ्यांची सूडभावनावीज ग्राहकांची लूट करण्यासाठी विद्युत अधिकारी-कर्मचारी नवनवीन फंडे उपयोगात आणतात. गरीब व मध्यम वर्गीयांना त्रास देवून वीज चोरीसाठी धनाढ्य लोकांना सहयोग करतात. लाईनमनपासून अधीक्षक अभियंत्यापर्यंत साठगाठ करून एक-दुसऱ्यांच्या इशाऱ्यावर त्रासदायी समस्या निर्माण केली जाते व वीज खंडित करून ग्राहकांची लुबाडणूक केली जाते, असा आरोप कनोजे यांनी केला आहे. आपण गंगाझरीच्या सहायक अभियंत्यांना २० हजार रूपये देण्याचे मान्य केले नाही. त्याचीच सूडभावना मनात ठेवून उपकार्यकारी अभियंता जस्माते यांच्या सहकार्याने गोंदियाच्या न्यायमंचाचे आदेश न मानता नागपूर न्यायमंचात अपिल केले, असा आरोपही कनोजे कुटुंबीयांनी केला आहे.
ग्राहक न्यायमंचच्या आदेशाची अवमानना
By admin | Updated: May 8, 2015 01:03 IST