कारवाईची मागणी : गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारागोंदिया : गोरेगाव तालुक्यातील बोरगाव (सुखपूर) येथे दलितवस्ती सुधारणा योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या रस्त्याचे बांधकाम दलित वस्तीत न करता अन्यत्र रस्त्यावर केले असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. सदर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी येथील गावकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत मौजा बोरगाव-सुखपूर येथे वर्ष २०१२ ते २०१४ च्या दरम्यान दलित वस्तीत दलित वस्तीच्या नावावर रस्ता बांधकाम करण्यात आले. मात्र सदर रस्ता बांधकाम दलित वस्तीत न बनविता येथील ग्रामसेवक तथा सरपंच यांनी संगनमत करुन अन्यत्र दुसऱ्या रस्त्यावर सदर बांधकाम केल्याचे निदर्शनास आले आहे. या संबंधात येथील सामाजिक कार्यकर्ते विनराज मेश्राम यांनी माहिती अधिकारात माहिती मागितली असता ग्रामपंचायत प्रशासनाचे सदर प्रकरणी पितळ उघड झाले आहे. ज्या परिसरात एकही दलित समाजाचे घर नाही, अशा ठिकाणी दलित वस्तीच्या नावावर रस्ता बांधकाम करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर सदर रस्ता बांधकाम करताना सर्व नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे. सदर प्रकरणाची तक्रार गावकरी तसेच विनराज मेश्राम यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, खंड विकास अधिकारी गोरेगाव यांच्याकडे केली. परंतु दोन महिने लोटूनही या प्रकरणाची साधी चौकशीही करण्यात आली नाही.दलित वस्तीत बांधकाम करताना शासनाने काही कठोर नियम लावून दिलेले आहेत. ज्या वस्तीत खरोखरच दलितांची घरे आहेत, त्यांच्याच वस्तीत रस्ता बांधकाम व्हावे, असा शासनाचा नियम आहे. मात्र ग्रामसेवक, सरपंच तसेच पंचायत समितीच्या बांधकाम अधिकाऱ्यांनी संगनमत करुन मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केलेला आहे.सदर प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करुन दोषी ग्रामसेवक, सरपंच व कनिष्ठ अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करावी अन्यथा ग्रामपंचायतसमोर उपोषण आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विनराज मेश्राम यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे. (प्रतिनिधी)
नियमबाह्य दलितवस्ती रस्त्याचे बांधकाम
By admin | Updated: April 29, 2016 01:50 IST