तहसीलदारांना निवेदन : धानाच्या भाववाढीसह शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणीगोंदिया : गोंदियासह जिल्ह्यातील सर्व तालुकास्थळी सोमवारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरत काही ठिकाणी मोर्चा काढून तर काही ठिकाणी तहसीलदारांना निवेदने देऊन सरकारविरोधातील आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केला. यावेळी धानाच्या भाववाढीसह इतर काही मागण्या मुख्यमंत्री व राज्यपालांच्या नावे करण्यात आल्या.गोंदिया तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आ.गोपालदास अग्रवाल, तालुका अध्यक्ष प्रकाश रहमतकर यांच्या नेतृत्वात तहसीलदार संजय पवार यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. तत्पूर्वी भोला भवन येथील काँग्रेस कार्यालयापासून जयस्तंभ चौक मार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला.यावेळी मार्गदर्शन करताना आ.गोपालदास अग्रवाल यांनी शेतकऱ्यांना ३ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याची मागणी केली. याशिवाय जवखेडा येथील दलित हत्याकांडाची सीबीआय चौकशी करावी अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी पं.स.सभापती कौशल्या बोपचे, उपसभापती चमन बिसेन, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अमर वऱ्हाडे, सचिव गेंदलाल शरणागत, कृ.उ.बा. समिती उपसभापती धनलाल ठाकरे, संचालक अरुणकुमार दुबे, माजी कृऊबा समिती सभापती धनंजय तुरकर, माजी पं.स.उपसभापती मनिष मेश्राम यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे गोरेगाव, तिरोडा येथेही तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. अर्जुनी मोरगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांच्या समस्या तसेच जवखेडा येथील तिहेरी हत्याकांडातील आरोपींना पकडून शिक्षा द्यावी याबाबतचे निवेदन तहसीलदार संतोष महाले यांना दिले. हे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्याचे आश्वासन तहसीलदारांनी निवेदनकर्त्यांना दिले.राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकरी अत्यंत संकटात सापडला असून आत्महत्येकडे वळत आहे. दुष्काळग्रस्त व कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये तर फळ बागायतदारांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, उत्पादन खर्चावर आधारित धान उत्पादक शेतकऱ्यांना अडीच हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात यावा व दिवसेंदिवस वाढणाऱ्या त्यांच्यावरील कर्जाचा बोझा कमी करावा, सततच्या नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती देवून वीज बील माफ करावे, तसेच जवखेडा येथे दलित समाजाच्या तिहेरी हत्याकांडातील आरोपींना त्वरित पकडून शिक्षा द्यावी, या मागण्यांचा त्यात समावेश होता.यावेळी कार्यकारी अध्यक्ष भागवत नाकाडे, महिला अध्यक्ष विशाखा साखरे, ललीतचंद्र राजाभोज, संजय मानकर, संतोष नरुले, महादेव कन्नाके, कृष्णा शहारे, शांता तलमले, जगदिशसिंह पवार, जगदीश मोहबंशी, लक्ष्मीकांत नाकाडे, नाशिक शहारे, रवि खोटेले, हंसा सोनपिंपळे, अरविंद पालीवाल, लता कापगते, वासुदेव उके, सुखदेव पवार उपस्थित होते. सालेकसाशेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सालेकसा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयावर सोमवारी धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातील शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांच्या धानाला प्रतिक्विंटल दोन हजार ५०० रूपये हमीभाव द्यावा, ५०० रुपये बोनस द्यावा, रबी व उन्हाळी पिकांसाठी सिरपूर धरणाचे पाणी मिळावे, मनरेगाअंतर्गत कामे त्वरित सुरू करण्यात यावी, बेरोजगारांना रोजगार तसेच बेरोजगारी भत्ता द्यावा, वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये करावी, शेतकऱ्यांना मोफत वीज व थकबाकी माफ करावी, शेतीवर कर्ज माफी देण्यात यावी, सर्वत्र शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र उघडण्यात यावे तसेच धान खरेदीची मर्यादा हेक्टरी २० क्ंिवटलवर ४० क्विंटल करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश होता. मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री भरत बहेकार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबा कटरे, सचिव यादवलाल बनोटे, लखनलाल अग्रवाल, खेमराज साखरे, विनय शर्मा, देवचंद ढेकवार, अनिल फुंडे आदी कार्यकर्ते व शेकडो शेतकरी सहभागी झाले. तहसील कार्यालयात शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून शेवटी तहसीलदार सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. (ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून)
काँग्रेस पदाधिकारी उतरले रस्त्यावर
By admin | Updated: December 1, 2014 22:55 IST