गोंदिया : ४ मार्च २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश खानविलकर यांच्या खंडपीठाने दिलेल्या निकालानुसार राज्यात २७ टक्के ओबीसी आरक्षण संपविण्यात आले. याबाबतची मागणी कुणी केली तर ही याचिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य व भंडारा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी केली होती, असा गंभीर आरोप भाजपचे आ. डॉ. परिणय फुके यांनी केला आहे.
डॉ. फुके यांनी म्हटले आहे की, एकीकडे ओबीसीच्या नावाखाली मते घ्यायची, मोठे-मोठे मोर्चे काढायचे, आंदोलने करायची आणि लोकांना सांगायचे की ओबीसी आरक्षण कमी होऊ देणार नाही आणि दुसरीकडे मात्र ओबीसी समाजाच्या विरोधात षडयंत्र रचून ओबीसी आरक्षण मिळू द्यायचे नाही. हा काँग्रेस पक्षाचा ढोंगीपणा आहे. ओबीसी मंत्रालय काँग्रेसकडे असूनही सर्वोच्च न्यायालयात महाविकास आघाडी सरकारला याबाबत योग्य भूमिका मांडता आली नाही. त्यावेळी काँग्रेस पक्ष आणि या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपले तोंड का उघडत नाहीत, असा सवाल फुके यांनी केला. काँग्रेस नेत्यांनीच ओबीसी आरक्षण संपविण्यासाठी याचिका दाखल केली असेल तर हे काँग्रेस नेते बोलणार तरी कसे? असा सवालही डॉ. फुके केला आहे. न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही महाविकास आघाडी सरकार ओबीसीसाठी आयोग स्थापन करीत नाही. ओबीसी बांधवांना आरक्षण मिळावे, असे या सरकारलाच वाटत नाही ही वस्तुस्थिती असून यानिमित्ताने काँग्रेस नेत्यांचा ढोंगीपणा जनतेसमोर आला आहे. ओबीसी समाज काँग्रेसला आणि या महाविकास आघाडी सरकारला कधीच माफ करणार नाही, असा इशारा डॉ. परिणय फुके यांनी दिला आहे.