केशोरी : सन २००७ पासून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त समित्या प्रत्येक गावात गठीत करुन गावातील वाद लोकसहभागातून गावातच मिटवून सामाजिक सलोखा व सुरक्षिततेची भावना वाढीस लागली होती. परंतु अलीकडच्या काळात तंटामुक्त समित्यांचे कार्य थंडावले असून गावातील लहान-सहान तक्रारीही आता थेट पोलीस ठाण्यात जाऊ लागल्या आहेत.
राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून राज्यात सन २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त समित्या प्रत्येक गावात गठित करण्यात आल्या. तेव्हा या समित्यांचे कार्यही वाखाणण्याजोगे होते. समित्यांच्या कार्याला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले होते. मात्र गेल्या काही वर्षापासून शासनासह प्रशासकीय यंत्रणेलाही या मोहिमेचा विसर पडला आहे. समाज हितासाठी राबविण्यात येत असलेली मोहीम सध्या कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. गेल्या ४ वर्षापासून तंटामुक्त गाव समित्यांचे मूल्यमापन करण्याचे काम बंद झाल्याने तंटामुक्त समित्यांकडून पूर्वीसारखे काम होताना दिसत नाही. कारण गावातील तंटे आता थेट पोलीस ठाण्यात जाऊ लागले आहेत. दरवर्षी तंटामुक्त गाव समित्यांचा आढावा घेऊन ज्या समित्यांचे काम चांगले होते त्यांना प्रशासनाकडून पुरस्कार देऊन प्रोत्साहन दिले जात होते. मात्र मागील ४ वर्षापासून तंटामुक्त समितीच्या कार्याचे मूल्यमापन होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.