गोंदिया : जिल्हा परिषदेंतर्गत अंतर्गत होणाऱ्या अनुकंपा पदभरतीसाठी उमेदवार चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत, पण अद्यापही यावर कुठलाच निर्णय झालेला नाही. त्यामुळे अनुकंपाधारक उमेदवार पुन्हा अडचणीत आले असून, त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
सन २०२० हे वर्ष आधी अधिकाऱ्यांच्या बदल्या व नंतर कोरोना संक्रमणाने प्रभावित झालेली अनुकंपा पदभरती प्रक्रियेला सुरुवात होईल, अशी आशा अनुकंपाधारकांना असताना, आता जि.प. आणि नगरपंचायतच्या निवडणुका होऊ घातल्याने, ती आशाही मावळली. अनुकंपा पदभरतीच्या संदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाला अनुकंपाधारकाबद्दल सहानुभूती नसल्याची स्थिती आहे. कोरोनाच्या काळात रिक्त पदांमुळे प्रशासनाची हतबलता सर्व जिल्हावासीयांनी अनुभवली आहे. एकीकडे रिक्त पदे व दुसरीकडे अनुकंपाधारकांचे वाढते वयोमान, यामुळे बिकट समस्या निर्माण झाली आहे. शासन निर्णयाला डावलून प्रक्रिया होत असल्याने, नेहमीच अनुकंपाधारकाच्या पदरी निराशा येत आहे. मागील ७ वर्षांपासून अनुकंपा पदभरती झालेली नाही, त्यातच अनुकंपाधारकाचे वयोमान वाढून ते अपात्र होत आहेत, अशा विविध समस्यांनी अनुकंपाधारक हैराण आहेत. जिल्ह्यात ५०० वर अनुकंपाधारक उमेदवार नोकरीसाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद कार्यालयाच्या पायऱ्या झिजवित आहेत, पण त्यांच्या समस्येची जाणीव अद्यापही प्रशासनाला झाली नाही. परिणामी, अनुकंपाधारकांचे कुटुंबीय विविध समस्यांना तोंड देत आहे. त्यामुळे अनुकंपाधारकांच्या समस्यांची जाणीव शासन आणि प्रशासनाला केव्हा होणार, असा सवाल अनुकंपाधारक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संजय हत्तीमारे यांनी केला आहे.
जि.प.निवडणुकीच्या पहीले शासन निर्णयाप्रमाणे अनुकंपा पदभरती झाली नाही, तर सर्व अनुकंपाधारक तीव्र आंदोलन करू, असा खळबळजनक इशारा त्यांनी दिला आहे.