गोंदिया : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. मागील बारा दिवसांच्या कालावधीत ९ हजारावर बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र बुधवारी (दि.२१) प्रथमच बाधितांपेक्षा मात करणाऱ्यांची संख्या अधिक होती. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात बुधवारी ७४५ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली. तर ६२९ नवीन रुग्णांची नोंद झाली. १४ बाधितांचा शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ६२९ रुग्णांमध्ये सर्वाधिक ३५५ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ७३, गोरेगाव ११, आमगाव ३३, सालेकसा १४, देवरी ५३, सडक अर्जुनी ३०, अर्जुनी मोरगाव ५२ आणि बाहेरील ८ बाधितांचा समावेश आहे. जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागात सुध्दा कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे बऱ्याच गावांनी गावबंदी तसेच गावाचे सॅनिटायझेशन करुन प्रादुर्भाव कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर लसीकरण मोहीम सुध्दा व्यापक स्तरावर सुरु आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात १२६०९६ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले आहे. त्यापैकी १०४१५१ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत १२७७५ जणांचे नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १०६०२७ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २७७१३ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी २०६५६ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ६६५६ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून यापैकी ५२६१ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. तर ३९४४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयाेगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
............
प्रलबिंत नमुन्यांची संख्या वाढली
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने चाचणी करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र दररोज १२०० नमुने तपासणी करण्याची येथील प्रयोगशाळेची क्षमता आहे. मात्र त्यापेक्षा अधिक नमुन्यांची तपासणी करुन सुध्दा चार हजारावर नमुने प्रलबिंत राहत असल्याने प्रयोगशाळेवरील ताण वाढला आहे.
.............
चार चार दिवस अहवाल मिळेना
कोरोनाचा आलेख सातत्याने उंचावत आहे. त्यातच आरटीपीसीआर चाचण्यांचा अहवाल चार चार दिवस मिळत नसल्याने बाधित रुग्ण देखील अनेकांच्या संपर्कात येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. नवीन आरटीपीसीआर मशीन अद्यापही आली नसल्याने प्रयोगशाळेवरील ताण वाढत आहे.