फुटाना : तालुक्यातील ग्राम गडेगाव येथील सरपंच उपसरपंचासह सदस्यांना विश्वासात न घेता मनमर्जी कारभार करून एकतर्फी निर्णय घेत असल्याचा आरोप करीत ७ सदस्यांनी आपला सामूहिक राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून या सदस्यांनी ग्रामपंचायत बरखास्त करून प्रशासक नेमावा, अशी मागणी केली आहे.
सरपंच कविता भीमराव वालदे या शासनाच्या विविध योजनाअंतर्गत गावात होत असलेली कामे उपसरपंच व सदस्यांना विश्वासात न घेता करीत असल्याचा आरोप या सदस्यांकडून होत होता. यामुळे ग्रामपंचायत सदस्य हतबल झाले होते. अखेर ९ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतमधील ७ सदस्यांनी सामूहिक राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ग्रामपंचायतच्या गुरुवारच्या (दि.१) विशेष सभेत उपसरपंच लीलाराम मडावी, ग्रामपंचायत सदस्य हंसराज चंदमलागर, श्रीराम कुंभरे, ईश्वरदास अरकरा, शशिकला कुंभरे, सारिका पडोटी व चंद्रकला पडोटी या सदस्यांनी आपला सामूहिक राजीनामा सरपंचाकडे सादर केला. या सदस्यांचा राजीनामा बैठकीत मंजूर करण्यात आला.
-------------------------
प्रशासक नेमण्याची सदस्यांची मागणी
९ सदस्यांपैकी ७ सदस्यांनी राजीनामे दिल्याने सदस्य संख्या निम्याहून कमी झाली आहे. त्यामुळे ही ग्रामपंचायत बरखास्त करून प्रशासक नेमावा, अशी मागणी राजीनामा दिलेल्या सदस्यांनी गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. मात्र सरपंच वालदे थेट जनतेतून निवडून आल्यामुळे तिथे प्रशासक बसवून कारभार चालतो की सरपंच कारभार चालवितो, याकडे गडेगाववासीयांचे लक्ष लागून आहे.
----------------------
सदस्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिल्यामुळे त्यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले आहेत. पुढील निर्णय प्रशासन घेईल.
- कविता भीमराव वालदे, सरपंच ग्रामपंचायत गडेगाव.
...............
सरपंचाच्या मनमर्जी कारभाराला कंटाळून ग्रामपंचायतच्या ७ सदस्यांनी राजीनामा दिला आहे. प्रशासनाने यात लक्ष देऊन त्वरित कार्य करावे.
- हंसराज चंदनमलागर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत गडेगाव.