गोंदिया : बाई गंगाबाई महिला रूग्णालयात दाखल झालेला एका महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करून डॉ. पूनम पारधीने तिच्या पोटातून तीन किलोचा मासाचा गोळा काढला. त्यामुळे सदर रूग्ण महिलेची त्रासातून सुटका झाली. उषा वैकुंठी असे त्या महिलेचे नाव असून ही शस्त्रक्रिया बुधवार (दि.२५) रोजी करण्यात आली.जिल्ह्यात बाई गंगाबाई रूग्णालय हे एकमेव महिलांसाठी रूग्णालय आहे. येथे जिल्हाभरातील महिला उपचारासाठी येतात. मात्र रूग्णालयाच्या ढिसाळ सेवेवर नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात. परंतु या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. पूनम मुकेश पारधी यांनी रूग्णालयावर लागलेले ढिसाळ सेवेचे कलंक पुसून काढले. दोन दिवसांपूर्वी घिवारी येथील रहिवासी उषा वैकुंठी (२४) ही महिला रूग्णालयात दाखल झाली होती. त्यापूर्वी सदर महिलेने खासगी रूग्णालयात जावून उपचार घेतला होता. दरम्यान तिच्या पोटात मासाचा गोळा असल्याचे निदर्शनास आले. परंतु आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याचे शस्त्रक्रिया व औषधोपचारासाठी पैशाची तरतूद होवू शकली नाही. शिवाय तिला सहा महिन्याचे एक अपत्यसुद्धा आहे. याच विवंचनेत असताना तिने बाई गंगाबाई महिला रूग्णालयाचा आधार घेतला. डॉ. पूनम पारधी यांनी रूग्ण महिलेचा पूर्व इतिहास जाणून घेतला. आवश्यक ती तपासणी केली व बुधवारी शस्त्रक्रिया केली. जवळपास दीड तास चाललेल्या या शस्त्रक्रियेदरम्यान तिच्या पोटातून तीन किलोचा मासाचा गोळा बाहेर काढण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर त्या रूग्ण महिलेची प्रकृती स्थिर होती. त्या महिलेच्या कुटुंबीयांनी डॉ. पूनम पारधी यांचे आभार मानले. (प्रतिनिधी)
महिलेच्या पोटातून काढला साडेतीन किलोचा गोळा
By admin | Updated: February 27, 2015 00:40 IST