तोडगा निघेना : गोंदियासोबत तिरोडा, आमगावातही ‘गांधीगिरी’ आंदोलन गोंदिया : सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदी-विक्री व्यवहारावर लावण्यात आलेल्या एक्साईज ड्युटी प्रकरणात अद्याप तोडगा न निघाल्याने सराफा व्यवसायिकांनी आता बेमुदत बंद पुकारला आहे. मंगळवारी या बेमुदत बंदअंतर्गत गोंदियातील सराफा व्यवसायिकांनी दुर्गा चौकात ठिय्या दिला. तसेच बुधवारपासून (दि.९) पुन्हा चहानाश्त्याचे दुकान लावून गांधीगिरी करणार असल्याचे सांगितले. आमगाव भाजीपाल्याचे दुकान तर तिरोड्यात नमो कँटीन लावून अनोख्या पद्धतीने सराफा व्यावसायिकांनी आपला निषेध नोंदविला.वित्तमंत्री अरूण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदी-विक्रीवर १ टक्के एक्साईज ट्युटी लावली आहे. हा अतिरिक्त भुर्दंड हटविण्याच्या मागणीसाठी देशपातळीवर सराफा व्यवसायिकांनी बंद पुकारला आहे. अगोदर २, ३ व ४ मार्चपर्यंत असलेल्या या बंदला ७ मार्चपर्यंत वाढविण्यात आले होते. यादरम्यान राज्य सराफा असोसिशएनची शासनासोबत चर्चा सुरू होती. मात्र सराफा व्यवसायीकांच्या मागणीवर तोडगा न निघाल्याने आता बेमुदत बंद पुकारण्यात आला. बुधवारपासून (दि.९) दागिने तयार करणारे सोनारही बंदमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली. या बेमुदत बंदमध्ये जिल्ह्यातील सर्व सराफा व्यवसायिक सहभागी झाल्याने दररोज कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प पडले आहेत. बुधवारपासून (दि.९) गोंदियात पुन्हा चहानाश्त्याचे दुकान थाटून गांधीगिरी केली जाणार आहे.(शहर प्रतिनिधी)
कोट्यवधींचे सराफा व्यवहार बंद
By admin | Updated: March 9, 2016 02:50 IST