गोंदिया : ‘होळी जळाली अन् थंडी पळाली’ अशी म्हण घरातील वृद्धमंडळींकडून बोलली जाते. यानुसार होळी जळताच उन्हाळ्याला सुरूवात होत असल्याचे समजते. मात्र वातावरणातील असमतोलाने आता कधी उन्ह तर कधी पाऊस याचा नेम राहिला नाही. त्यात आता जिल्ह्यातील तापमानात वाढ होत असून अंगाला चटके लावणारी उन्ह पडू लागली आहे. रविवारी (दि. २८) जिल्ह्याचे तापमान ३७.६ अंश सेल्सिअस नोंदण्यात आले होते. उन्ह बघता घरातून बाहेर पडणे कठीण होत आहे.
२ दिवस उन्हाचा तडाखा राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. हे ऐकूनच जिल्हावासीयांना घबराट सुटली आहे. आता मार्च महिना संपला नसून तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या घरात गेले असल्याने पुढील २ महिने कसे राहणार, हा विचारच धडकी भरवत आहे. आतापासूनच तापमान वाढत चालले असून अंगाची लाहीलाही करणारे ऊन पडू लागले आहे. परिणामी घराबाहेर पडण्यासाठी नागरिक घाबरत आहेत. विशेष म्हणजे, होळीनंतर खऱ्या अर्थाने उन्हाळा सुरू होतो असे वृद्ध सांगतात.
त्यामुळे आता होळी जळाल्यावर तापमान आणखी किती वाढणार याचा विचारच घाम फोडत आहे. जिल्ह्यात तसेही चांगलेच उन्ह तापते व उन्हाळा काढणे कठीण होते. त्यात वातावरणातील असमतोलामुळे उन्हाची दाहकता वाढतच चालली आहे. हेच कारण आहे की, पूर्वीप्रमाणे थंडी पडत नसून ऊन मात्र वाढत आहे. अशात आता एप्रिल व मे महिना कसा निघणार याची कल्पनाच अंगावर काटे आणत आहे.