गुन्हा दाखल : सडक-अर्जुनी येथील कारवाई गोंदिया : नावाची दुरूस्ती व वारसान हक्क चढवून फेरफार करण्यासाठी १० हजार रूपयांची मागणी करून ती रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. ही कारवाई गुरूवारी (दि.१) सायंकाळी सडक-अर्जुनी येथे करण्यात आली. सविस्तर असे की, तक्रारदारांचे वडिलोपार्जीत घर सडक-अर्जुनी येथे असून वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे दोन भाऊ व दोन बहिणींच्या नावाने वारसान हक्क चढवून फेरफार करण्यासाठी त्यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात लिपीक उमेश मधुकर बोरकर यांच्याकडे कागदपत्र दिले. २१ आॅगस्ट रोजी तक्रारदार त्याला कामाबाबत विचारणा करण्यासाठी भेटले. यावर बोरकर याने वडिलांच्या नावात त्रुटी असून त्याची दुरूस्ती व संबंधितांचे नाव वारसान हक्क चढवून फेरफार करण्यासाठी १० हजारांची मागणी केली. यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदविली. त्या तक्रारीच्या आधारे पडताळणी केली असता बोरकर याने पाच हजार रूपयांची मागणी करून रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली. यावर पथकाने डुग्गीपार पोलीस ठाण्यात बोरकरविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ कलम ७ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. (शहर प्रतिनिधी)
लिपिकाने केली १० हजारांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2016 01:38 IST