बाराभाटी : गावखेड्यामध्ये अनेक दिवसांपासून नाल्यांमध्ये केरकचरा जमा झालेला आहे. चिखलसुद्धा साचलेला आहे,अशा प्रकारे ग्रामीण भागात घाणीचे साम्राज्य जमलेले आहे. तेव्हा मान्सूनपूर्व सफाई व स्वच्छता करणे आवश्यक असल्याने नागरिक सफाईची मागणी करीत आहेत.
परिसरातील अनेक गावात नाल्या आहेत, विहिरी आहेत, बोअरवेल व नळ आहेत अशा पाण्याच्या ठिकाणाजवळ नाल्यामध्ये चिखल जमलेला आहे. विहिरीजवळ ओला व सुका कचरा आहे. गावगाड्यात अनेक भागात नालीद्वारे पाणी पास होत नाही. घराच्या बाजूला जर पाणी साचले असेल तर मच्छर तयार होतात. तेव्हा रोगाचाही प्रसार होण्यास विलंब लागत नाही. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने गावात साफसफाई असावी, म्हणजे निरोगी राहण्यास मदत होईल. अनेक गावात रस्त्यावर कचरा टाकला जातो, मग रहदारीस नागरिकांना अडथळा होतो, ये-जा होत नाही, अशा कचऱ्याचे नियोजन नाही. या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाने जातीने लक्ष देऊन काम करावे, अशी मागणी बाराभाटी येरंडी-देवलगाव बोळदे कवठा डोंगरगाव चापटी सुरगाव सुकळी खैरी ब्राम्हणटोला कुंभीटोला येथील गावकऱ्यांनी केली आहे.