शहरात कीटकनाशक फवारणीची मागणी
सालेकसा : वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात डास व किटकांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या डास व किटकांपासून संसर्गजन्य आजार फोफावण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात सध्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून मलेरिया, डेंग्यू या आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नगर पंचायतीने डासनाशक फवारणी करण्याची गरज आहे.
दवनीवाडा ते गंगाझरी बसफेरी सुरू
परसवाडा : गोंदिया आगाराची दवनीवाडा-गंगाझरी- गोंदिया ही बसफेरी मागील दीड वर्षापासून बंद होती. जिल्ह्यात आता कोरोना आटोक्यात आला. सर्वच व्यवहार सुरळीत झाले आहेत. शिवाय बसफेऱ्यांच्या संख्येतसुद्धा वाढ झाली आहे. दवनीवाडा- गंगाझरी- गोंदिया ही बसफेरी सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी गोंदिया आगारप्रमुखांना पत्र देऊन केली होती. त्याचीच दखल घेत ही बसफेरी गुरुवारपासून (दि.१२) सुरू केली आहे. यामुळे परिसरातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. छाया दसहरे, हितेंद्र लिल्हारे, काशीराम लांजेवार यांनी बस सुरू होण्यासाठी प्रयत्न केले.
देवरीत विजेचा लपंडाव; ऑनलाईन कामांचा खोळंबा
देवरी : शहारासह ग्रामीण भागातही विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास सुरू असून विविध कंपन्यांतील कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम देखील सुरू आहे. दिवसांतून चार पाच वेळा वीजपुरवठा ठप्प होता. त्याचा फटका व्यावसायिकांनाही बसत आहे. विद्युत विभागाच्या गलथान कारभाराचा फटका सर्वात जास्त ग्रामीण जनतेला बसत आहे.
देवरी येथील विद्युत उपकेंद्र अगोदर ६६ केव्हीचे होते. परंतु मागील ८ वर्षांपासून ते ३३ केव्ही करण्यात आले आहे. वाढती लोकसंख्या, औद्योगिकरणाच्या दृष्टीने जास्त विजेची मागणी होत आहे. परंतु ३३ केव्ही उपकेंद्र असल्याने व एमआयडीसी क्षेत्रातील कंपन्यांना जास्तीची वीज लागत असल्याने देवरी शहरातील लोकांना त्याचा फटका बसत आहे.
रात्री विजेचा दाब कमी होत असल्याने विद्युत उपकरणे खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. कमी दाब व वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोराेनामुळे शाळा, काॅलेज बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. मात्र वीजपुरवठा खंडित झाला की यंत्रणा बंद पडते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तरीही वीज बिल भरमसाठ येत आहे.
वीजपुरवठा सुरळीत होत नसेल तर महावितरण कंपनीने वीज देयके सुद्धा नागरिकांना वाटू नयेत, असा संताप नागिरकांनी व्यक्त केला आहे. विजेच्या अनेक समस्या असताना वीजबिले मात्र अव्वाच्या सव्वा पाठविली जातात. वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील नागिरकांनी केली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी राजकीय मंडळींनी प्रयत्न करावेत, अशी मागणी देवरीवासीयांनी केली आहे.